Pune Section 144 : पुणेकरांनो लक्ष द्या! 18 ते 31 ऑगस्टदरम्यान शहरात जमावबंदी; 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास निर्बंध

महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम 37 (1), (2) आणि (3) मधील तरतुदींनुसार शहरभरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

Pune Section 144 : पुणेकरांनो लक्ष द्या! 18 ते 31 ऑगस्टदरम्यान शहरात जमावबंदी; 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास निर्बंध

Pune Section 144 : पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आगामी सण-उत्सव आणि विविध सामाजिक-राजकीय घडामोडींच्या काळात शहरात शांतता टिकवून ठेवण्यासाठी पुणे पोलीस प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम 37 (1), (2) आणि (3) मधील तरतुदींनुसार शहरभरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. विशेष शाखेचे पोलीस उपआयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा निर्णय 18 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12:01 वाजेपासून लागू होणार असून 31 ऑगस्ट रोजी रात्री 12:00 वाजेपर्यंत अंमलात राहील. आगामी रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा आणि ईद-ए-मिलाद या सणांच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.

सार्वजनिक ठिकाणी बंदी घालण्यात आलेल्या बाबी
या आदेशानुसार पुणे पोलीस आयुक्तालायाच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी ज्वालाग्राही पदार्थ, स्फोटके, दगड, शस्त्रे अथवा इजा पोहोचवू शकणाऱ्या कोणत्याही वस्तू बाळगण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय कोणत्याही व्यक्तीचे अथवा नेत्याचे पुतळे जाळणे, प्रतिकात्मक दहन करणे तसेच भावना भडकवतील अशा आक्षेपार्ह घोषणा देणे किंवा चिथावणीखोर गाणी वाजवण्यास मनाई करण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून भीतीचे वातावरण पसरवणारे व्हिडिओ, गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्या रील किंवा अफवा शेअर करणाऱ्यांवरही पोलीस प्रशासन बारीक लक्ष ठेवून असणार आहे.

परवानगीशिवाय सभा आणि रॅलींवर निर्बंध
सुरक्षेचा उपाय म्हणून 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमून सभा, निदर्शने, मोर्चे किंवा रॅली आयोजित करण्यासाठी पोलीस आयुक्तांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. पूर्वपरवानगीशिवाय आंदोलन किंवा गर्दी जमवणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई केली जाईल. मात्र, हा नियम कर्तव्यावर असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असणार नाही. तसेच खाजगी सुरक्षा रक्षकांना त्यांच्या ड्युटीदरम्यान 3.5 फूट लांबीपर्यंतची काठी बाळगण्यास मुभा देण्यात आली आहे.

हेही वाचा – UP Yogi Adityanath Action : महाराष्ट्रातील कारवाईचा देशभर डंका! मुंढेंच्या पावलावर पाऊल ठेवत योगी सरकारची ॲनालॉग डेअरी उत्पादनांवर कायदेशीर गदा

नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कडक कारवाई
पुणे पोलिसांनी या आदेशाचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन केले आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीविरोधात महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम 135 अंतर्गत थेट गुन्हा दाखल केला जाईल. हा आदेश संपल्यानंतरही उल्लंघनाशी संबंधित कायदेशीर तपास आणि दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरूच राहील, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number