नाशिक, २८ जुलै २०२३, प्रतिनिधी: नाशिक शहरातील महिला सुरक्षा कक्षातील भरोसा सेलमध्ये एका व्यक्तीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे, महिला पोलिसांच्या समोरच हत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडल्याने नाशकात खळबळ उडाली आहे. शरणपूर परिसरातील भरोसा महिला कक्षात हा थरारक प्रकार घडला आहे.
नाशिक शहरातील महिला सुरक्षा कक्षातील भरोसा कक्षात पती-पत्नीच्या वादातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. पती-पत्नीच्या वादातून महिलेच्या मामाने पतीला सुऱ्याने भोसकत हत्येचा प्रयत्न केला. मुलीच्या मामाने थेट महिला पोलिसांच्या उपस्थितच हल्ला केला आहे. आरोपीचे नाव नानासाहेब नारायण ठाकरे असे आहे.
पती-पत्नींमधील वाद टोकाला
शुक्रवारी दोघांचीही तिसरी तारीख होती. त्याचवेळी दोघांमध्ये वाद झाले. हा वाद विकोपाला गेल्यानंतर मुलीचा मामा यात मध्ये पडला आणि त्याने महिला सुरक्षा कक्षातच पतीवर चाकुने हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला आहे. संतोष पंडित असं जखमी पतीचे नाव आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी पुढील कारवाई करण्यात येत आहे. तर, गंभीर जखमी झालेल्या पतीला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र, महिला पोलिसांच्या भरोसा कक्षात असा प्रकार घडल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.