एसटी महामंडळ राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. बीडमध्ये गेल्या ३२ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. विलिनीकरणाची मागणी पूर्ण होईपर्यंत राज्य सरकारने कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ करण्याचा निर्णय घेतला. मात्र तरिही कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत.
बीडमध्ये शनिवारी रात्री आगार प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांचे आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. आंदोलनासाठी एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने बीड बसस्थानक परिसरात टाकण्यात आलेला मंडप प्रशासनाने काढून टाकला. या घटनेनंतर कर्मचारी आणखी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी शासनाचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान आंदोलनाचा मंडप काढून टाकण्यात आल्याने महिला एसटी कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर झाले.
एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा कामावर रुजू होण्याचे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे. कर्मचारी कामावर न आल्यास एसटी अत्यावश्यक सेवेत एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायद्यांतर्गत कारवाई होणार असल्याचा इशारा अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना दिला आहे. तसेच एसटी कर्मचारी अत्यावश्यक सेवेत मोडत नसून या कर्मचाऱ्यांचा फ्रंटलाईन वर्करमध्ये समावेश केला नसल्याचे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे.