‘अशिया कप’मध्ये वेगवेगळ्या देशांचे संघ सहभागी असले, तरी क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलंय ते भारत-पाकिस्तान सामन्यांकडे. अरब अमिरातीमध्ये होत असलेल्या अशिया कप सामन्यांमध्ये एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असणारे भारत- पाकिस्तान संघ बऱ्याच काळाने एकमेकांशी भिडणार आहे. 19 सप्टेंबरला त्यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. जेव्हा हे दोन देश आमने-सामने येतात, तेव्हा लोक ही मॅच केवळ खेळ म्हणून पाहात नाहीत, तर त्याला अक्षरशः युद्धाचं स्वरूप येतं. म्हणूनचभारत-पाकिस्तान मॅचच्या तिकिटांसाठी जास्त किंमत मोजायला लोक तयार आहेत.
दोघांचं भांडण, तिसऱ्याचा लाभ!
भारत- पाकिस्तामध्ये होणाऱ्या मॅचेसची तिकिटं विकत घ्यायला दोन्ही देशांचे समर्थक गर्दी करत आहेत. मात्र काहीजणांनी याचा अंदाज बांधत आधीच तिकिटं विकत घेतली आहेत आणि आता ती दुप्पट किमतीला विकत आहेत. भारत- पाक सामन्याच्या तिकिटाचा दर प्रत्यक्षात 150 AED म्हणजेच सुमारे 3000 रुपये आहे. मात्र तिच तिकिटं आता 300 ते 400 AED म्हणजेच 6000 ते 8000 रुपयांना विकली जात आहेत. फायनल मॅचच्या तिकिटांची किंमत 650 AED म्हणजेच सुमारे 12,800 रुपयांच्या आसपास असतानाच ही तिकिटं 1000 AED म्हणजेच सुमारे 20,000 रुपयांना विकली जात आहेत. मुख्य म्हणजे एवढे पैसे भरून लोक तिकिटं विकत घेत आहेत. सध्या तरी यावर कोणतेही निर्बंध नाहीत. ब्लॅकमध्ये तिकिट्स विकायला बंदी असली, तरी ही नेमकी ब्लॅकमध्येच विकली जात असल्याचा पुरावा अद्याप नाही. म्हणूनच वाट्टेल त्या दराने तिकिट विकणाऱ्यांचं फावतंय आणि आपल्या लाडक्या संघाला समर्थन देण्यासाठी लोकही हजारो रुपये खर्च करून सामने पाहायला तयार आहेत.
ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन!
भारत आणि पाकिस्तानचा संघ आमने-सामने येणार म्हटल्यावर दोन्ही देशांमधून क्रिकेटप्रेमीही मोठ्या संख्येने दुबईमध्ये दाखल होत आहेत. पॅव्हेलियनमध्ये आपल्या देशाच्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी चाहत्यांची गर्दी होत आहे. जास्तीत जास्त लोक आपल्या देशातील असावेत, आणि त्यामुळे विरोधी संघावर दडपण यावं, असा हेतू असल्यामुळे लोकांचे जत्थेच्या जत्थे तिकीटं काढण्यासाठी रांगा लावून उभे आहेत. टीम इंडियाच्या समर्थकांसाठी ऑरेंज झोन ठेवण्यात आला आहे, तर पाकिस्तान समर्थकांचा ग्रीन झोन आहे. या दोन्ही झोन्समध्ये आपआपल्या देशाच्या टीमला प्रोत्साहन देण्यासाठी जास्तीत जास्त भारतीय आणि पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींमध्ये रस्सीखेच सुरू आहे.
त्यामुळेच तुम्हाला जर टीम इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियमवर जायचं असेल, तर तिकीट आणि व्हिसाच्याबरोबरच आणखी 20 ते 25 हजार रुपये खर्च करावे लागतील.