जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव
सरकारी कामं करणारे ठेकेदार किती माजलेयत याचा धक्कादायक अनुभव स्वत एका नगरसेविकेला आला. जळगावच्या नगरसेविका अश्विनी देशमुख सध्या न्याय मागत आहेत. आपल्या प्रभागात ठेकेदार स्वच्छता नीट करत नसल्याची तक्रार त्यांनी केली. अश्विनी देशमुख यांनी आरोग्याधिकारी तसंच इतर पदाधिकाऱ्यांचा स्टिंग ऑपरेशन करुन पर्दाफाश केला. आम्ही हे नमूद करतो की हे स्टींग ‘जय महाराष्ट्र’चं नाही.
जतसफाई ठेकेदारीत भागीदार असलेल्या नगरसेविका चव्हाण, महापालिकेचे आरोग्य अधिकारी विकास पाटील यांनी आपल्याला महीना पंधरा हजार रुपये लाचेची ऑफर दिली असा धक्कादायक आरोपही त्यांनी केला.
पण याच नगरसेविकेला पैशाचं आमिष दाखवून तीचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आपण झुकत नसल्याचं पाहून ठेकेदारांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप या नगरसेविकेनं केला. आपल्यावर पाळत ठेवली जाते. घरांवर बाटल्या फेकल्या जातात. ठेकेदारांची मुजोरी एवढी वाढली असल्यानं काय करावं हा प्रश्न त्यांना पडला.
ठेकेदार आणि अधिकारी मिलीभगत करुन ठेके घेतात. प्रत्यक्षात साफसफाई न करता लाखोंची बिलं मात्र मंजूर करुन घेतात. एकमेकांच्य भागीदारीनं आर्थिक हीत जोपासत असल्याचा गंभीर आरोप नगरसेविका अश्विनी देशमुख यांनी केला.