Ashok Kharat Case: खरात आणि मुंबईतील हॉटेलच्या ‘त्या’ रुमचं रहस्य! वर्षभरासाठी बुक असायची रुम; खरात प्रकरणात चक्रावणारी माहिती समोर

मुंबईत भोंदू अशोक खरात याच्या हवाला रॅकेटचा पर्दाफाश झाला असून, त्याचे धागेदोरे दुबई आणि ऑस्ट्रेलियापर्यंत पोहोचले आहेत.

Ashok Kharat Case: खरात आणि मुंबईतील हॉटेलच्या ‘त्या’ रुमचं रहस्य! वर्षभरासाठी बुक असायची रुम; खरात प्रकरणात चक्रावणारी माहिती समोर

मुंबई: अध्यात्माचा मुखवटा चढवून भोळ्याभाबळ्या जनतेला जादूटोण्याच्या जाळ्यात ओढणारा भोंदू अशोक खरात हा केवळ एक ठग नसून, आंतरराष्ट्रीय आर्थिक गुन्हेगारीचा एक 'मास्टरमाइंड' असल्याचे आता उघड होत आहे. मुंबईतील एका आलिशान पंचतारांकित हॉटेलमधून खरातने चालवलेल्या 'हवाला'च्या समांतर अर्थव्यवस्थेचा पर्दाफाश झाला असून, या प्रकरणाचे धागेदोरे आता सातासमुद्रापार दुबई आणि ऑस्ट्रेलियापर्यंत पोहोचले आहेत. विशेष तपास पथकाच्या हाती लागलेले पुरावे पाहता, हे प्रकरण केवळ फसवणुकीचे नसून देशाच्या आर्थिक सुरक्षेला लागलेली एक मोठी वाळवी असल्याचे स्पष्ट होत आहे.

तपासात समोर आलेली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, खरातने मुंबईतील एका नामांकित पंचतारांकित हॉटेलमध्ये एक विशेष 'रूम' वर्षभराच्या 365 दिवसांसाठी बुक करून ठेवली होती. ज्या रूमचे एका दिवसाचे भाडे 25 हजार रुपये होते, तिथे खरातचे वास्तव्य केवळ विलासासाठी नव्हते, तर ते कोट्यवधींच्या देवाणघेवाणीचे मुख्य केंद्र होते. या आलिशान खोलीतूनच राजकीय नेते आणि बड्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या 'काळ्या' पैशांची विल्हेवाट लावली जात होती. हॉटेलच्या चार भिंतींच्या आड चालणाऱ्या या काळबेरजाची कुणकुण कोणालाही लागू नये, यासाठी खरातने मोठी सावधगिरी बाळगली होती.

हेही वाचा: Mumbai Local Megablock : लोकल प्रवासासाठी बाहेर पडताय? सांभाळून, दादरपर्यंत लोकल बंद; जाणून घ्या आजच वेळापत्रक

एसआयटीने न्यायालयासमोर सादर केलेल्या माहितीनुसार, अशोक खरातने केवळ भारतातच नव्हे, तर दुबई, ऑस्ट्रेलिया आणि इतर पाच देशांमध्ये हवालाच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये वळवले आहेत. या रॅकेटमध्ये काही बड्या धेंडांचा समावेश असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. खरातच्या या 'मायाजालात' राजकारण्यांपासून ते सनदी अधिकाऱ्यांपर्यंत कोणाकोणाचे पैसे गुंतले आहेत, याचा शोध आता केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. 

या प्रकरणाची व्याप्ती पाहता, हे केवळ राज्यासाठी मर्यादित राहिलेले नाही. खरातने जादूटोणा आणि भोंदूपणाच्या नावाखाली जमवलेला पैसा देशाबाहेर पाठवण्यासाठी ज्या यंत्रणेचा वापर केला, ती यंत्रणा देशाच्या सुरक्षेसाठी घातक ठरू शकते. त्यामुळेच आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सक्तवसुली संचालनालय आणि केंद्रीय संस्थांमार्फत करण्याची मागणी करण्यात येत आहे. राज्य सरकारने असलेले सर्व महत्त्वपूर्ण पुरावे केंद्र सरकारला सोपवावेत, जेणेकरून या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा समूळ नायनाट करता येईल, अशी अपेक्षा राजकीय क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.

एकेकाळी स्वतःला सिद्ध पुरुष म्हणवून घेणारा हा भोंदू आता कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे. "पापाचा घडा भरला की तो फुटतोच," यानुसार खरातच्या काळ्या साम्राज्याचा अंत जवळ आल्याचे दिसते. मात्र, या तपासात पुढे येणारी नावे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि प्रशासनात मोठी खळबळ उडवून देणारी ठरू शकतात. आता सर्वांचे लक्ष एसआयटीच्या पुढील कारवाईकडे आणि या प्रकरणात उघड होणाऱ्या नवीन 'दुबई कनेक्शन'कडे लागले आहे. 

हेही वाचा: Fishermen Evacuates: युद्धाच्या छायेतून मायभूमीच्या कुशीत; इराणमध्ये अडकलेल्या 345 मच्छिमारांची आर्मेनियामार्गे 'घरवापसी'

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number