Asha Bhosle: आशा भोसले यांचं निधन कशामुळे झालं? जवळच्या व्यक्तीने सांगितलं खरं कारण

हजारो गाण्यांच्या माध्यमातून त्यांनी अमर ठसा उमटवला असून, त्यांचा आवाज कायम स्मरणात राहणार आहे.

Asha Bhosle: आशा भोसले यांचं निधन कशामुळे झालं? जवळच्या व्यक्तीने सांगितलं खरं कारण

मुंबई: सुरांच्या अविरत प्रवाहाला आज एक वेदनादायी विराम मिळाला. भारतीय संगीतविश्वावर अजरामर छाप उमटवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका आशाताई भोसले यांनी रविवार, 12 एप्रिल 2026 रोजी अखेरचा श्वास घेतला. दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचं निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. स्वरांची जादू पसरवणारा हा आवाज कायमचा थांबल्याने देशभरात शोककळा पसरली आहे.

शनिवारी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सुरुवातीला छातीच्या संसर्गामुळे त्यांची प्रकृती खालावली असल्याचं सांगण्यात आलं होतं; मात्र उपचारांदरम्यान त्यांची तब्येत अधिकच गंभीर झाली. अखेरीस सर्व अवयव निकामी झाल्याने (मल्टी ऑर्गन फेल्युअर) त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं.

त्यांच्या निधनानंतर कुटुंबीयांनी अंत्यविधीची माहिती दिली आहे. सोमवारी दुपारी चार वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, सकाळी 11 ते 2 या वेळेत लोअर परळ येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांचे पुत्र आनंद भोसले यांनी ही माहिती दिली. चाहत्यांसाठी हा क्षण केवळ निरोपाचा नसून, एका युगाच्या समाप्तीचा साक्षीदार ठरणार आहे.

हेही वाचा: Asha Bhosle: संगीताच्या दुनियेतील 'दम मारो दम'! आशा भोसले यांनी कशी मोडली परंपरेची चौकट? जाणून घ्या त्यांच्या कारकिर्दीतील सुवर्णक्षण

आशा भोसले यांची नात झनाई भोसले हिने सुरुवातीला त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना छातीच्या संसर्गामुळे त्या रुग्णालयात दाखल असल्याचं सांगितलं होतं. त्यांना प्रचंड थकवा जाणवत होता आणि उपचार सुरू असल्याने त्या लवकर बऱ्या होतील, अशी आशा व्यक्त करण्यात आली होती. मात्र नियतीचा निर्णय वेगळाच ठरला. त्यांच्या प्रकृतीबाबत देशभरातून चिंता व्यक्त केली जात होती, आणि नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली होती.

8 सप्टेंबर 1933 रोजी जन्मलेल्या आशा भोसले या लता मंगेशकर यांच्या धाकट्या बहिण. 1943 पासून त्यांनी चित्रपटसृष्टीत गायनाची सुरुवात केली आणि पुढे शास्त्रीय, पॉप, कॅब्रे, गझल अशा विविध प्रकारच्या गाण्यांत त्यांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. त्यांनी विविध भाषांमध्ये 12000 हून अधिक गाणी गात संगीतविश्वाला समृद्ध केलं.

आज आशा भोसले यांचा देह नश्वर झाला असला, तरी त्यांचा आवाज काळाच्या पलीकडे जिवंत राहणार आहे. त्यांच्या स्वरांनी अनेक पिढ्यांच्या भावना व्यक्त केल्या, आणि त्यांच्या गाण्यांनी असंख्य क्षणांना अर्थ दिला. अशा या सुरसम्राज्ञीला निरोप देताना एकच भावना मनात दाटून येते काही व्यक्ती जातात, पण त्यांची कला कधीच मरत नाही.

हेही वाचा: Asha Bhosle Passed Away : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन; बावनकुळेंसह शेलार आणि इतर भाजप नेत्यांकडून श्रद्धांजली

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number