आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी एनसीबी (नार्कोटिक्स क्न्ट्रोल ब्युरो)चे तपास अधिकारी विश्वविजय सिंह यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. या अधिकाऱ्याने सहकाऱ्यांसह कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. दरम्यान, याप्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. मात्र, विश्वविजय सिंह यांच्यावर दुसऱ्या प्रकरणी कारवाई झालेली आहे.
विश्वविजय सिंह यांना दुसऱ्या प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. परंतु त्यांनी केलेल्या या तपासात काही त्रुटी आढळल्या होत्या. याप्रकरणी त्यांची वर्षभरापूर्वी चौकशीही करण्यात आली होती. चौकशीअंती मागील वर्षी एप्रिल महिन्यात सेवेतून निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर आता त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून विश्वविजय सिंह यांना कायमचं सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे.
चेन्नईचे डीजीटीएस अतिरिक्त आयुक्त समीर वानखेडे आणि विश्वविजय सिंह या दोन अधिकाऱ्यांनी मुंबईहून गोव्याला निघालेल्या क्रूझवर छापेमारी केली होती. या कारवाईत त्यांनी १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम मेफेड्रॉन, २१ ग्रॅम मारिजुना, २२ एमडीपीएच्या गोळ्या इतके अमली पदार्थ आणि १.३३ लाख रुपये रोख रक्कम जप्त केली असल्याचा दावा एनसीबीने केला. तसेच याप्रकरणी आर्यन खानसह इतर १७ जणांवर कारवाई करत अटक करण्यात आली होती.
दरम्यान, याप्रकरणात चौकशी दरम्यान काही चुकीच्या गोष्टी आढळल्यामुळे समीर वानखेडे यांची दुसऱ्या विभागात बदली करण्यात आली आहे. समीर वानखेडे हे चेन्नईचे डीजीटीएस अतिरिक्त आयुक्तपदी कार्यरत आहेत.