एकीकडे पाहुणचाराचा थाट आणि दुसरीकडे संशयाचे काळेकुट्ट जाळे या विसंगतीत एका निष्पाप गृहिणीचा बळी गेला आहे. केवळ ‘मटण नीट शिजले नाही’ या शुल्लक कारणावरून झालेल्या वादाने आर्णी तालुक्यातील बोरगाव येथे एका हसत्या-खेळत्या संसाराची राखरांगोळी झाली. पतीने आपल्या मित्रासमोर केलेला अपमान सहन न झाल्याने पत्नीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. चेतना मनोज जाधव (वय 33) असे मृत महिलेचे नाव आहे.
चेतना जाधव हिच्यासाठी तो दिवस शेवटचा ठरेल, असे कोणालाही वाटले नव्हते. चेतनाचा पती मनोज जाधव याने एका मित्राला जेवणासाठी घरी बोलावले होते. ‘मटणाची भाजी चांगली आणि व्यवस्थित कर,’ अशी सूचना त्याने पत्नीला दिली होती. अंगणात जेवणाचा बेत रंगला होता, पण पाहुण्यासमोरच मनोजचा पारा चढला. मटण व्यवस्थित शिजले नसल्याच्या कारणावरून त्याने पत्नीशी जोरदार वाद घालण्यास सुरुवात केली.
हा वाद केवळ स्वयंपाकापुरता मर्यादित राहिला नाही, तर त्यात मनोजच्या संशयी स्वभावाचा आणि व्यसनाधीनतेचा परिणामही दिसून आला. मिळालेल्या माहितीनुसार, मनोज हा दारूच्या आहारी गेला होता. यापूर्वीही २०१५ मध्ये त्याच्यावर कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल झाला होता. २०१७ मध्ये ‘पुन्हा सुखाने संसार करू’ या अटीवर चेतनाने त्याला माफ केले होते.
मात्र, बुधवारी झालेल्या अपमानाचा घाव चेतनाच्या मनावर इतका खोल बसला की, तिने टोकाचे पाऊल उचलले. भरल्या ताटावरून उठून ती घरात गेली आणि तिने विषारी औषध प्राशन केले. काही वेळानंतर तिने बाहेर येऊन ही बाब पतीला सांगितली, तेव्हा एकच खळबळ उडाली. तिला तातडीने आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले.
या प्रकरणी चेतनाचे मामा मनोहर राठोड (रा. देवगाव) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मनोज जाधव याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. चेतनाच्या मृत्यूनंतर आर्णी ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती आणि त्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. सध्या सर्वांचे लक्ष शवविच्छेदन अहवालाकडे लागले असून, पोलीस उपनिरीक्षक पल्लवी निनगूरकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.