नाशिकमध्ये भाजपच्या चार नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भाजपला मोठा धक्का बसला. त्यानंतर नाशिकच्या भाजपाचे प्रभारी म्हणून गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान प्रभारी आमदार जयकुमार रावल यांना हटवून त्यांच्या जागी गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकची जबाबदारी देण्यात आली आहे. तर जयकुमार रावल यांच्याकडे सहप्रभारी पदाची जबाबदारी दिली आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षनेत्यांनी कंबर कसली आहे. तर भाजपच्या प्रभारी असलेल्या जयकुमार रावल यांच्यावर पक्षात नाराजी असल्याने गिरीष महाजनांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.
राज्यात भाजपची सत्ता असताना नाशिकचे पालकमंत्री पद गिरीश महाजन यांच्याकडे होते. गिरीश महाजन यांच्यावेळी भाजपची अनेक कार्य पाहण्यास आली. मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकारचे सत्तांतर झाल्यानंतर महाजन यांचे नाशिककडे दुर्लक्ष झाले. त्यातच भाजपच्या चार नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यामुळे संकटमोचन गिरीश महाजन पुन्हा एकदा नाशिक महापालिका निवडणूकीत रिंगणात उतरविण्यात आले आहे. त्यानुसार नाशिक भाजपाचे प्रभारी म्हणून गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.