माथाडी कामगारांच्या महाराष्ट्र शासनाच्या कामगार, गृह, पणन-सहकार, नगरविकास, महसूल व अन्य खात्यांतर्गत प्रलंबित असलेल्या समस्या सोडवण्याकडे नवीन सरकार दुर्लक्ष करत असून, सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा एकदिवसीय राज्यव्यापी संप पुकारला होता. एपीएमसी बाजार हे आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. त्यामुळे या बाजरपेठेत नेहमीच २५-३० कोटींची आर्थिक उलाढाल होत असते. परंतु, आज लाक्षणिक बंदने सर्वच व्यवहार, व्यवसाय ठप्प होता.
महाराष्ट्रसह वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगारांसह व्यापारी यांच्यासह अन्य बाजार घटकांनी राज्यव्यापी लाक्षणिक संप पुकारला आहे. दरम्यान एपीएमसीमधील पाचही बाजारात कडकडीत बंद ठेवण्यात आला. या संपाला सर्वांनी पाठींबा देत बाजार पूर्णतः बंद ठेवला. त्यामुळे नित्याचे होणारे व्यवहार, उलाढाल आज पूर्णपणे बंदच होते.
एपीएमसी बाजारात कांदा बटाटा, भाजीपाला, फळबाजार, मसाला, धान्य या पाचही बाजारात दररोज हजारहून अधिक गाड्यांची नोंद होत असते. त्यामध्ये भाजीपाला बाजारात अधिक शेतमाल नित्याने दाखल होत असतो. भाजीपालाच्या ६०० हून अधिक, तर फळबाजारात ५०० गाड्या दाखल होत असतात. मात्र, आज बुधवारी बाजार पूर्णपणे बंद असल्याने एकही गाडी बाजारात दाखल झाली नव्हती. भाजीपाला बाजारात मध्यरात्रीपासूनच सुरू होणारे व्यवहार आज मात्र पूर्ण ठप्प होते.