शिवसेनेत फूट पडल्याने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे राज्यात सत्तांतर घडून आले. परंतु, या अनाकलनीय सत्तांतरामागे कोणाचा छुपा पांठिबा होता हे उघड झालेले नाही. याबाबत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मंगळवारी मोठा गौप्यस्फोट केला आहे. या बंडामागे फडणवीसांचा हात होता, असा दावा तानाजी सावंत यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने राज्यात मी पहिल्यांदा बंडखोरी केली, असा गौप्यस्फोट आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांनी केलाय. २०१९ मध्ये मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतरच महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मी स्वत: मिळून १५० बैठका घेतल्या आणि आमदारांचे मन वळवल्याचा दावाही त्यांनी केला. धाराशीवमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. जनतेच्या कौलाकडे पाठ वळवणाऱ्या लोकांना इशारा देण्यासाठी मातोश्रीवर जाऊन हात दाखवणारा मी पहिला होतो, असेही सावंत म्हणाले.
सावंत म्हणाले की, ” सरकार सत्तेत आल्यानंतर ३० डिसेंबर २०१९ ला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. ३ जानेवारी २०२० च्या आसपास सुजितसिंह ठाकूर आणि मी देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने तमाम महाराष्ट्रात पहिल्यांदा बंडखोरी केली. धाराशिव जिल्हा परिषद शिवसेना-भाजपची, जे साडेबारा कोटी जनतेने मँडेट दिलं होतं, ती सुरुवात या ठिकाणाहून केली, ही वस्तुस्थिती आहे. त्या वेळी बंडाचं निशाण फडकवणारा तानाजी सावंत होता. मी तेवढ्यापुरता थांबलेलो नव्हतो. ज्यांना इशारा द्यायचा होता, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा मातोश्रीवर जाऊन हात करून सांगितलं, की परत या मातोश्रीची पायरी चढणार नाही आणि हे सरकार उलथवल्याशिवाय तानाजी सावंत गप्प बसणार नाही.”