देशभरात अग्निपथ योजनेला विरोध होत असून विद्यार्थी संघटनांनी शनिवारी ‘बिहार बंद’ची घोषणा केली आहे. बिहारमध्ये आरजेडी आणि डाव्यांनी विद्यार्थी संघटनांना पाठिंबा दिला आहे. देशभरात अग्निपथ योजनेला सातत्याने विरोध होत आहे. लष्करातील चार वर्षांच्या सेवेच्या नव्या योजनेच्या विरोधात बिहारमध्ये महाआघाडीचे अनेक पक्ष विद्यार्थी आणि तरुणांच्या समर्थनार्थ उतरले आहेत. अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ एआयएसए सोबतच आर्मी रिक्रूटमेंट जवान मोर्चा आणि रोजगार संघर्ष युनायटेड फ्रंटने बंदची हाक दिली आहे.
लष्करात चार वर्षांच्या सेवेनंतर निवृत्तीसाठी देण्यात येणारी ही योजना मागे घेण्यासाठी विद्यार्थी संघटनांनी सरकारला ७२ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. दरम्यान, बिहारमधील १२ जिल्ह्यांमध्ये १९ जूनपर्यंत इंटरनेट सेवेवर बंदी घालण्यात आली आहे.
अग्निपथ योजनेला बिहारमध्ये सर्वाधिक विरोध होतो आहे. बिहारमधील सुमारे २२ जिल्ह्यांमध्ये, विद्यार्थी आणि हजारो तरुणांनी सलग तिसऱ्या दिवशी अग्निपथ योजनेला विरोध करत रेल्वेला लक्ष्य केले आहे. यावेळी आंदोलकांनी आठ गाड्या पेटवून दिल्या.
देशभरात अग्निपथ योजनेला विरोध होत असल्याने सध्या भारतीय रेल्वेला सर्वाधिक फटका बसत आहे. आतापर्यंत ३४० गाड्यांवर परिणाम झाल्याने रेल्वेचे ४० कोटींहून अधिक नुकसान झाले आहे.