जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे लोकपाल आणि शेतकरी प्रश्नांसाठी दिल्लीतील रामलीला मैदानात उपोषणाला बसलेले होते. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या असून उपोषण मागे घेत आहे, असं अण्णांनी जाहीर केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अण्णांनी उपोषण मागे घेतलं होतं.
अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पारनेर तालुक्यात ठिकठिकाणी गुरुवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. अण्णांचे उपोषण सुटल्यानंतर समर्थकांनी वाडिया पार्क क्रीडा संकुल येथील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर विजयोत्सव साजरा केला.
अण्णांनी उपोषण सोडल्याचे समजले आणि राळेगणसिद्धीत जल्लोष सुरू झाला. अण्णांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरु झाली आहे. गुलालाची उधळण करीत गावात विजयी मिरवणूक काढण्यात आली. महिलांनी फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला. अण्णांचे गावात आगमन झाल्यानंतर विजयोत्सव साजरा करून मिरवणूक काढण्यात येणार आहे.