मुंबई, २१ जुलै २०२३, प्रतिनिधी : मणिपूरमधील हिंसक घटनांच्या मालिकेने गुरूवारी वेगळेच वळण घेतले त्यातून दोन महिलांवरील अत्याचाराबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यावरून संसदेत विरोधक आक्रमक होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घटनेची गंभीर दखल घेत, या प्रकरणातील दोषींवर कडक आणि ताकदीनिशी कारवाईचा बडगा उगारणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे मणिपुरातील माहिलांवर अत्याचार करण्याऱ्यांची गय करणार नसल्याचे मोदींनी बोलून दाखवले.
यासंदर्भात बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, आज मी तुमच्यासमोर आलोय, या लोकशाहीच्या मंदिरासमोर उभा असताना माझं हृदय दु:खाने भरलेले आहे. संतापाने भरलेले आहे. मणिपूरमधील जी घटनासमोर आली आहे ती कोणत्याही सभ्य समाजासाठी ही लज्जास्पद घटना आहे. पाप करणारे, गुन्हा करणारे किती आहेत, कोण आहेत हे सर्व समोर येईलच मात्र ही घटना संपूर्ण देशासाठी लज्जास्पद आहे. १४० कोटी भारतीयांना शर्मेनं मान खाली घालावी लागत आहे. या घटनेत सहभागी असलेल्यांना सोडले जाणार नाही, त्यांच्यावर पूर्ण ताकदीनिशी आणि कडक कारवाई केली जाईल. महिलांवर अन्याय होऊ नये यासाठी कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना केले आहे.
या घटनेची सर्वोच्च न्यायालयानेही स्वत:हून दखल घेत कठोर टिप्पणी केली आहे. ‘मणिपूरच्या या घटनेबाबत सरकारने कारवाई न केल्यास आम्ही कारवाई करू,’ असे सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने सांगितले. ‘आतापर्यंत काय कारवाई झाली’, याबाबत त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडून उत्तर मागितले आहे. आता पुढील सुनावणी २८ जुलै रोजी होणार आहे.
वास्तविक, मणिपूरमध्ये कुकी समाजाच्या दोन महिलांना विवस्त्र करून जमावाने रस्त्यावर धिंड काढली होतरी. ही बाब ४ मेची आहे. राजधानी इंफाळपासून ३५ किमी अंतरावर असलेल्या कांगपोकपी जिल्ह्यात ही घटना घडली. त्याचा व्हिडिओ बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. राज्यात अडीच महिन्यांहून अधिक काळ हिंसाचार सुरू आहे. मणिपूरच्या मुद्द्यावर आज संसदेत गदारोळ होण्याची शक्यता आहे. काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढ़ी, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) खासदार प्रियांका चतुर्वेदी आणि सीपीआय (एम) खासदार एलामाराम करीम यांच्यासह अनेक खासदारांनी मणिपूर मुद्द्यावर संसदेत चर्चेसाठी नोटिसा दिल्या आहेत.