विलेपार्ले पूर्व येथील स्टेशन रोडवरील मोगीबाई मार्केट परिसरात भीषण अपघात झाला आहे. सायंकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या इलेक्ट्रिक कारने तीन दुचाकीस्वारांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात किंजल हिरेन शहा (वय 41) यांचा मृत्यू झाला असून निर्मला डोजीया आणि प्रेमजी डोजीया हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
या धडकेमुळे दुचाकीस्वार रस्त्यावर फेकले गेले असून परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. जखमींवर सध्या गावडे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर कार चालक विलास श्रीधर गव्हाणकर (वय 44) याच्यावर निष्काळजी आणि बेदरकार वाहन चालविल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान रेल्वे स्टेशन रोडवरील वाहतुकीच्या गर्दीत हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा सुरू केला असून इलेक्ट्रिक कारचालकाची चौकशी केली जात आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी भरधाव वेग हे प्राथमिक कारण असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून CCTV फुटेजच्या आधारे पोलिस पुढील तपास करत आहेत.