नरेंद्र बटाव, प्रतिनिधी
नाशिक : नाशिकच्या नांदगाव परिसरातून बेपत्ता झालेली आठ महिन्यांची चिमुरडी अखेर येवला तालुक्यातील नगरसूल-वाईबोथी रोडवर रस्त्याच्या कडेला बेवारस अवस्थेत आढळून आली. चिमुरडी आढळल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिला ताब्यात घेतले. पीडितेची आई आणि नांदगाव पोलीस यांनी तिची ओळख पटवली. चिमुरडी सापडल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. दरम्यान, चिमुरडीवर येवला उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र नांदगावहून ही चिमुरडी येवल्यापर्यंत कशी पोहोचली, तिला येथे कोणी आणून सोडले का?, याबाबत आता पोलीस तपास करत आहेत.
काय आहे घटना
तीन दिवसांपूर्वी म्हणजेच गुरुवार, 17 सप्टेंबर रोजी नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील मन्याड चौकी परिसरातील बाभुळवाडी येथून अवघ्या आठ महिन्यांची चिमुकली बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. 17 तारखेच्या मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने चिमुकलीचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. याप्रकरणी नांदगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मध्यरात्रीच्या सुमारास चिमुकली बेपत्ता झाल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी परिसरात तिचा शोध घेतला. मात्र, बराच वेळ शोध घेऊनही तिचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत परिसरातील विविध ठिकाणी शोधमोहीम हाती घेतली होती. अखेर आज, रविवारी या चिमुरडीचा शोध लागला आहे.