Amravati: अमरावती गोळीबाराचा 24 तासांत पर्दाफाश; स्वतःच्याच घरावर गोळीबाराची निलंबित तलाठ्याने दिली सुपारी? आरोपी अटकेत

अमरावतीतील निलंबित तलाठी विपुल ठाकरे यांच्या घरावरील गोळीबाराचा 24 तासांत उलगडा झाला. स्वतःच्या घरावर गोळीबार घडवून आणल्याचा पोलिसांचा दावा असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Amravati: अमरावती गोळीबाराचा 24 तासांत पर्दाफाश; स्वतःच्याच घरावर गोळीबाराची निलंबित तलाठ्याने दिली सुपारी? आरोपी अटकेत

अमरावती: अर्जुन नगर परिसरात निलंबित तलाठी विपुल ठाकरे यांच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. सुरुवातीला अज्ञात व्यक्तींनी घरावर हल्ला केल्याचे समोर आले होते. मात्र, गुन्हे शाखेच्या तपासात हा गोळीबार बाहेरून झालेला हल्ला नसून ठाकरे यांनीच कथितरित्या घडवून आणल्याचे समोर आल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा अवघ्या 24 तासांत छडा लावत पोलिसांनी चार संशयितांना अटक केली आहे.

दीड लाखांची सुपारी दिल्याचा आरोप

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, विपुल ठाकरे यांनी स्वतःच्या घराच्या दिशेने गोळीबार करण्यासाठी आरोपींना कथितरित्या दीड लाख रुपयांची सुपारी दिली होती. या घटनेमागे नेमका उद्देश काय होता, याचा तपास सध्या सुरू आहे. न्यायालयीन प्रकरणात स्वतःची बाजू मजबूत करण्यासाठी आणि आपल्यावर हल्ला झाल्याचे चित्र निर्माण करण्याच्या उद्देशाने हा बनाव रचला असावा, अशी शक्यता तपास यंत्रणेकडून व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: Satish Maratha Case : गाडीची काच फोडली, तलवारीने 39 वेळा सपासप वार; सतीश मराठा हत्याकांडाचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल

बुरखा घालून आले, सीसीटीव्हीत दृश्य कैद

घटनेच्या रात्री दोन व्यक्ती दुचाकीवरून अर्जुन नगर परिसरात आल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. या व्यक्तींनी बुरखा परिधान केला होता. घराजवळ पोहोचल्यानंतर त्यांनी बंदुकीतून गोळीबार केला आणि त्यानंतर दुचाकीवरून पसार झाले. या संपूर्ण प्रकारातील काही महत्त्वाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. गोळीबारात घराच्या भिंतीला दोन गोळ्या लागल्या. सुदैवाने त्यावेळी घरात उपस्थित असलेल्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला दुखापत झाली नाही. गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

आधीच गंभीर गुन्ह्यात फरार

विपुल ठाकरे यांच्याविरोधात एका महिलेच्या तक्रारीवरून अत्याचाराचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात ते फरार असल्याची माहिती पोलिसांकडे आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या घरावर झालेल्या गोळीबारामुळे पोलिसांनी या घटनेकडे गांभीर्याने पाहत तपास सुरू केला होता.गुन्हे शाखेने तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली. त्यानंतर चार आरोपींना अटक करण्यात आली. या कटामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, आर्थिक व्यवहार कसा झाला आणि गोळीबारामागील नेमका उद्देश काय होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number