जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे 16 ते 18 जून या तीन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आले आहेत. या काळात ते तब्बल 18 बैठकी घेणार आहेत. राज्यातील भाजपाचे मंत्री, आमदार, खासदार यांच्या कार्याचा लेखाजोखाही ते घेणार आहेत.
दरम्यान अमित शाह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेणार आहेत. विशेष म्हणजे अमित शाह अध्यक्ष झाल्यापासून पहिल्यांदाच मातोश्रीवर जाणार आहेत. या भेटीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत चर्चेची शक्यता आहे.
राष्ट्रपतीपदी एनडीएचा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपला शिवसेनेच्या मतांची गरज आहे. गेल्या दोन्ही राष्ट्रपती निवडणुकीवेळी शिवसेनेने एनडीएत असूनही यूपीए उमेदवाराला मतं दिली होती. त्यामुळे आता खुद्द अमित शाहांनीच पुढाकार घेतला आहे.
तसंच शिवसेना आणि भाजपमधे ताणल्या गेलेल्या संबंधांवरही अमित शाह आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. अमित शाह आजपासून तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. शिवाजी पार्कवरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळालाही त्यांनी अभिवादन केलं.