नाती ही खूप नाजूक असतात, अनेक वेळा आपण समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे न ओळखताच एका गैरसमजामुळे त्या व्यक्तीसोबत असलेले सर्व नाते तोडायला बघतो. पण काही वेळा आपल्या नकळत आपल्या आयुष्यात गोष्टी वेगळ वळण घेतात आणि दयाळूपणाच्या कृतीने तुटलेली नाती कशी पुन्हा जुळू शकतात, हे कोणीही सांगू शकत नाही. असाच एक प्रसंग दिल्लीत घडला आहे. संसार मोडण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या जोडप्याचे आयुष्य एका कृतीमुळे बदलले आहे. 2020 मध्ये मोठ्या थाटामाटात झालेल्या एका लग्नात वादाची ठिणगी पडली आणि प्रकरण थेट घटस्फोटापर्यंत पोहोचले. मात्र नियतीच्या मनात काही तरी वेगळच होत.
दिल्लीतील शिखा सिंग आणि तिचा पती सौरभ यांचा विवाह 2020 मध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. मात्र कालांतराने दोघांमध्ये मतभेद वाढू लागले. पत्नीचे तिच्या पतीसोबत भांडण झाले आणि त्यानंतर तिने त्याच्याविरुद्ध हुंड्याचा खटला दाखल केला. हे जोडपे अनेक वर्षांपासून कायदेशीर लढाई लढत होते. या प्रदीर्घ कायदेशीर प्रक्रियेदरम्यान, शिखाच्या वडिलांनी हा खटला लढण्यात आपले सर्व पैसे खर्च केले आणि अखेरीस ते गंभीर आर्थिक अडचणीत सापडले.
मुलीचा मोडणारा संसार पाहून वडिलांना हृदयविकाराचा झटका आला. कोर्टात दोघांच्याही वकिलांची तयारी सुरू होती, दुसरीकडे शिखाचे वडील आयसीयूत जीवन मरणाच्या दारात होते. त्यांची प्रकृती इतकी खालावली की त्यांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र खर्च परवडत नसल्याने त्यांना उपचारही मिळू शकले नाही. जेव्हा शिखाचा पती सौरभला याबद्दल माहिती मिळाली, तेव्हा तो सरकारी रुग्णालयात पोहोचला आणि त्याने आपल्या सासऱ्यांना तेथून काढून गुडगावमधील सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या मेदांता ग्रुपमध्ये दाखल केले.
त्यानंतर आता शिखाच्या वडिलांची तब्येत ठिक असून ते पूर्णपणे बरे आहेत. शिखाला पुढील सुनावणीसाठी दिल्ली न्यायालयात हजर राहायचे होते, मात्र रुसवे-फुगवे आणि अहंकार बाजूला ठेवून एका जावयाने संकटसमयी दाखवलेल्या माणुसकीमुळे पत्नीने भर कोर्टातच घटस्फोटाचे कागदपत्रे फाडून पतीला मिठी मारली आणि ती ढसाढसा रडली. ज्यामुळे त्यांच्या अनेक वर्षांच्या कायदेशीर लढाईचा भावनिक आणि अनपेक्षित शेवट झाला. दिल्लीच्या एका फॅमिली कोर्टातून एक अशी भावुक आणि डोळ्यात पाणी आणणारी ही घटना सोशल मीडियावर व्हायरल होत असून सौरभने कोर्टातील न्यायाधीशांपासून ते वकिलांपर्यंत सर्वांचेच हृदय जिंकले आहे.