अंबाजोगाई: बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई आणि केज परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून सावत्र आई आणि मुलाच्या प्रेमसंबंधांचा शेवट दोन मृत्यूंमध्ये झाला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नातेसंबंध, समाजमान्यता आणि मानसिक तणाव या विषयांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केज तालुक्यातील सोनी जवळा येथील साहेबराव पवार यांनी काही वर्षांपूर्वी पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर अनिता नावाच्या महिलेशी दुसरे लग्न केले होते. संसार सुरळीत सुरू असतानाच साहेबराव यांच्या पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा अनिल पवार आणि सावत्र आई अनिता यांच्यात जवळीक वाढल्याची माहिती समोर आली. कालांतराने या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले.
हे संबंध घरातील सदस्यांच्या लक्षात आल्यानंतर परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनली. काही दिवसांपूर्वी अनिल आणि अनिता हे दोघे घरातून निघून थेट तेलंगणात गेल्याचे समोर आले. पत्नी आणि मुलगा बेपत्ता झाल्याने साहेबराव पवार यांनी पोलिसांकडे धाव घेतली. तांत्रिक तपास आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी दोघांचा शोध घेत तेलंगणातून त्यांना ताब्यात घेतले.
दरम्यान, आपल्या संबंधांची माहिती समाजात आणि नातेवाईकांमध्ये उघड झाल्यामुळे अनिल मानसिक तणावाखाली गेला होता. या नैराश्यातून त्याने विषारी औषध प्राशन केल्याची माहिती समोर आली आहे. त्याची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्याला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. चार दिवस उपचार सुरू असतानाही त्याची प्रकृती सुधारली नाही आणि अखेर त्याचा मृत्यू झाला.
अनिलच्या मृत्यूची बातमी समजताच अनिता हिला मोठा धक्का बसला. प्रिय व्यक्तीचा मृत्यू सहन न झाल्याने तिनेही अत्यंत टोकाचं पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. ही माहिती मिळताच डॉक्टर आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
अंबाजोगाई शहर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड चर्चा रंगली असून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. नात्यांच्या मर्यादा ओलांडल्यानंतर निर्माण होणारे सामाजिक आणि मानसिक परिणाम किती गंभीर असू शकतात, याचं हे धक्कादायक उदाहरण असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. या प्रकरणामुळे सोशल मीडियावरही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. पोलिसांकडून दोन्ही घटनांचा स्वतंत्र तपास सुरू असून संपूर्ण प्रकरणाची माहिती गोळा केली जात आहे.