नवी दिल्ली: 3 जुलै 2026 पासून सुरू होणाऱ्या यंदाच्या पवित्र अमरनाथ यात्रेसाठी आजपासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. भाविकांना श्री अमरनाथजी श्राइन बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा देशभरातील 554 हून अधिक अधिकृत बँक शाखांमधून नोंदणी करता येणार आहे. जम्मू-काश्मीर बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, आयसीआयसीआय बँक, यस बँक आणि ॲक्सिस बँक या बँकांच्या निवडक शाखांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे.
यंदाची अमरनाथ यात्रा 3 जुलैपासून सुरू होऊन 28 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. एकूण 57 दिवस चालणारी ही यात्रा मागील काही वर्षांच्या तुलनेत अधिक मोठी असणार आहे. नोंदणी ‘पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य’ या तत्त्वावर होणार असून प्रत्येक मार्गासाठी दररोज ठराविक कोटा ठेवण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांनी लवकरात लवकर नोंदणी करण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.
नोंदणी पूर्ण झाल्यानंतर भाविकांना यात्रा परवाना दिला जाईल. या परवान्यात प्रवासाची तारीख, निवडलेला मार्ग आणि प्रवेशाची वेळ नमूद असेल. याशिवाय, यंदा सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक यात्रेकरूस आरएफआयडी कार्ड देण्यात येणार आहे. हे कार्ड यात्रेदरम्यान सतत जवळ बाळगणे बंधनकारक असेल. याच्या मदतीने प्रशासनाला यात्रेकरूंचे रिअल-टाइम ट्रॅकिंग करता येणार आहे.
उंच डोंगररांगा आणि कठीण हवामान लक्षात घेता यात्रेसाठी कठोर आरोग्य नियम लागू करण्यात आले आहेत. 13 ते 70 वर्षे वयोगटातील व्यक्तींनाच यात्रेसाठी पात्रता असेल. सहा आठवड्यांपेक्षा अधिक गर्भार असलेल्या महिलांना यात्रेसाठी नोंदणी करता येणार नाही. तसेच सर्व यात्रेकरूंना 8 एप्रिल 2026 नंतर अधिकृत डॉक्टर किंवा वैद्यकीय संस्थेकडून जारी केलेले अनिवार्य आरोग्य प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल.
अमरनाथ गुहेतील नैसर्गिक बर्फाचे शिवलिंग हे या यात्रेचे मुख्य आकर्षण आहे. दरवर्षी लाखो भाविक कठीण डोंगररस्ता पार करत या पवित्र स्थळी दर्शनासाठी पोहोचतात. यंदाही मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.