Jalgaon: माणुसकीला काळीमा! अंत्यसंस्कारासाठी मृतदेह थेट कचऱ्याच्या गाडीतून; अमळनेरमधील धक्कादायक घटना

जळगावच्या अमळनेरमध्ये बेवारस मृतदेह अंत्यसंस्कारासाठी कचरा वाहतुकीच्या घंटागाडीतून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

Jalgaon: माणुसकीला काळीमा! अंत्यसंस्कारासाठी मृतदेह थेट कचऱ्याच्या गाडीतून; अमळनेरमधील धक्कादायक घटना

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. बेवारस मृतदेह अंत्यसंस्कारासाठी चक्क नगरपालिकेच्या कचरा वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या घंटागाडीतून नेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरात काही दिवसांपूर्वी एक बेवारस मृतदेह आढळून आला होता. संबंधित मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलवून त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. मात्र, दोन दिवस उलटल्यानंतरही मृत व्यक्तीचे कोणतेही नातेवाईक पुढे आले नाहीत. त्यामुळे प्रशासनाने संबंधित मृतदेहावर विधिवत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा: MNS : 'बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये लोकशाही टिकवण्यासाठी..'; पक्षांतराच्या गलिच्छ राजकारणावर मनसेची ही भूमिका

यावेळी मृतदेह सन्मानपूर्वक शववाहिकेतून स्मशानभूमीत नेण्याची अपेक्षा होती. मात्र, नगरपालिकेच्या ठेकेदाराने अत्यंत असंवेदनशीलपणे हा मृतदेह कचरा वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या घंटागाडीतून नेल्याचा आरोप होत आहे. या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

अगोदरच बेवारस अवस्थेत मृत्यू झालेल्या व्यक्तीला कुटुंबीयांचा आधार नव्हता. अशा परिस्थितीत प्रशासनाने किमान मृत्यूनंतर तरी त्या व्यक्तीला सन्मानाने निरोप द्यायला हवा होता, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. मात्र, कचरा गाडीतून मृतदेह नेण्याच्या प्रकारामुळे मानवी मूल्यांचा ऱ्हास झाल्याची टीका होत आहे.

हेही वाचा: Cabinet Expansion: केंद्रात मंत्रिपद मिळवण्यासाठी तिरुपती बालाजीला साकडे? मध्यरात्री 3800 पायऱ्या चढून श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंचं देवदर्शन

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अमळनेर नगरपालिकेवर टीकेची झोड उठली आहे. नागरिकांसह सामाजिक संघटनांनीही या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अमळनेरचे नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला काळीमा फासणारी असल्याचे म्हटले आहे. संबंधित ठेकेदाराने निष्काळजीपणा केला की हा प्रकार जाणूनबुजून घडवला, याची सखोल चौकशी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच चौकशीत दोषी आढळल्यास संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. यासोबतच नगरपालिकेचा ठेका रद्द करण्यासारखी कठोर पावलेही उचलली जातील, असा इशाराही नगराध्यक्षांनी दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number