अभिनेता आलोकनाथ यांनी आपल्यावर झालेल्या आरोपाला सडेतोड उत्तर म्हणून लेखिका-निर्माती विंता नंदा याच्या विरुद्ध मानहानीची तक्रार दाखल केली आहे. तसंच नंदा यांनी आपली लिखित स्वरुपात माफी मागावी, शिवाय भरपाईच्या रूपात चक्क ‘1’ रुपया द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
आलोकनाथ यांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा थेट आरोप विंता नंदा यांनी फेसबुक पोस्टद्वारे केला होता. #METOO मुळे उघडकीस आलेल्या या प्रकरणाला सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांवर उधाणच आले आहे. नंदा यांच्या आरोपांनंतर सिने अॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशननंही अर्थात ‘सिन्टा’नेही आलोकनाथना नोटीस पाठवली होती. त्यावरही आलोकनाथ यांनी आपल्यावर करण्यात आलेले सर्व आरोप निराधार असल्याचे उत्तर दिले आहे. आलोकनाथ यांचे वकील अशोक सराओगी यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली.
आलोकनाथ आणि त्यांच्या पत्नी आशु यांनी आपल्या तक्रारीत नंदांनी केलेले सर्व आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. नंदा यांच्या आरोपांमुळे आपली नाहक बदनामी झाली असून त्यामुळे विन्ता नंदा यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकत नुकसान भरपाई म्हणून लाखोस करोडो नव्हे, तर अवघा 1 रुपया आलोक नाथ यांनी मागितला आहे.