मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण करण्याच्या अट्टाहसापोटी राणा दाम्पत्याला कोठडी सुनावण्यात आली होती. राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाच्या गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेले राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा आरोप सिद्ध होत नसल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाने नोंदवले आहे.
राणा दाम्पत्याला जामीन देताना मुंबई सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा आरोप सिद्ध होत नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलं आहे.
राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तसेच मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला जामीन मंजूर करताना पाच अटी घातल्या होत्या.
राणा दाम्पत्याने शनिवारी (२३ एप्रिल) मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ते मुंबईत दाखल झाले होते. मात्र, राणा दाम्पत्याच्या या निर्णयामुळे शिवसैनिक आक्रमक झाले असून त्यांच्या खार येथील घराला चहू बाजूंनी शिवसैनिकांनी घेराव घातला होता. त्यामुळे त्यांना हनुमान चालीसा पठण करण्यासाठी मातोश्रीसमोर पोहचता आले नाही. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यामुळे राणा दाम्पत्यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्णय मागे घेत असल्याचं सांगितलं. मात्र, घडल्या प्रकरणाच्या परिणामी राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी, त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली गेली होती.