मुंबई: महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व दुकाने आता 24 तास खुली ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्यातील सर्व दुकाने, हॉटेल्स आणि इतर अस्थापना 24 तास उघडी ठेवता येणार आहेत. परंतु काही दुकानांसाठी हा नियम लागू नसेल.
महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना अधिनियम 2017 हा अधिनियम सर्व दुकाने, निवासी हॉटेल, उपाहारगृहे, खाद्यगृहे, थिएटर्स, सार्वजनिक मनोरंजनाच्या किंवा करमणुकीच्या इतर जागा येतील नोकरीला राहणारे, कर्मचाऱ्यांच्या इतर सेवांतील नियमन करण्यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित किंवा बाबींकरीता तरतूद करण्यासाठी महाराष्ट्रात हा नियम लागू करण्यात आला आहे. मात्र मद्यपान गृहे, बार परमिट रूम, हुक्का पार्लर, देशी बार हे 24 तास सुरू राहणार नाहीत. तर इतर सर्व आस्थापना ,खाद्यगृहे आणि दुकाने आता 24 तास सुरू राहतील.
महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना (नोकर्यांचे व सेवासंबंधी नियमन) अधिनियम, 2017 च्या कलम 21(2) मध्ये 'दिवस' अशी व्याख्या, मध्यरात्रीपासून सुरू होणारा 24 तासांचा कालावधी, अशी नमूद करण्यात आली आहे. अधिनियमाच्या कलम 16 (1) (ख) मध्ये आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस धंदा करण्यास खुल्या ठेवता येणार आहेत. पण तरीही प्रत्येक कर्मचाऱ्यास आठवड्यातून 24 तास सलग विश्रांती मिळेल, साप्ताहिक सुट्टी देण्यात येईल, अशी तरतूद कायद्यात करण्यात आली.
महाराष्ट्र सरकार दुकाने आणि आस्थापना (नोकर्यांचे व सेवासंबंधी नियमन) अधिनियम, 2017मधील कलम 11 अंतर्गत एखाद्या क्षेत्रासाठी किंवा निरनिराळ्या क्षेत्रांसाठी आणि निरनिराळ्या कालावधीसाठी, निरनिराळ्या प्रकारच्या आस्थापनांच्या वर्गांच्या परिसरात व्यापारी संकुल किंवा मॉल यांच्यासाठी सुरू आणि बंद करण्याच्या वेळा निश्चित करण्याचे अधिकार राज्य शासनास प्रदान करण्यात आलेले आहेत.
शासनाने 2017 रोजीच्या अधिसूचनेन्वये राज्यातील विविध क्षेत्रांतील मद्यविक्री आणि मद्य पुरविणाऱ्या आस्थापनांच्या सुरू आणि बंद करण्याच्या वेळा निश्चित केल्या होत्या. अशा आस्थापना 24 तास सुरू राहणार नाहीत. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना संदर्भातील निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.