राज्यात गेल्या काही दिवसांपासून भोंगा प्रकरण चांगलच तापलं आहे. मशिदीवरील भोंगे उतरवण्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून याप्रकरणी राजकीय वातावरण तापलेले आहे. दरम्यान, या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. तसेच, दुसरीकडे भाजपचे काही नेते या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भाजप नेत्यांची राज्य सरकारविषयी असलेली नाराजी यातून दिसून येत आहे. दरम्यान, राज्यात मशिदींवरील भोंगा उतरवण्याबाबत आक्रमक भूमिका घेतलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे या बैठकीस उपस्थित राहणार नाहीत, तर त्यांच्या जागी मनसे नेते बाळा नांदगावकर हे प्रतिनिधित्व करणार आहेत.
भोंग्यांबाबतच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने सोमवारी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीविषयीचे संकेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गेल्या आठवड्यातच दिले होते. मात्र, या सर्वपक्षीय बैठकीला भाजप नेत्यांनी मात्र बहिष्कार टाकल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, नाना पटोले , चंद्रकांत पाटील, जयंत पाटील, बाळा नांदगावकर, राज ठाकरे, हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर, अबू आझमी, विनायक मेटे, वारिस पठाण, रहीस शेख यांना या बैठकीचे आमंत्रण आहे. मात्र, राज ठाकरे यांच्यासहित भाजप नेते या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत अशी सूत्रांची माहिती आहे.
दरम्यान, सोमवारी होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी, ‘आजच्या सर्व पक्षीय बैठकीत सर्वोच्च न्यायालय, विविध उच्च न्यायालय यांनी दिलेले निर्णय, तसेच ध्वनी प्रदूषण कायदा याचा सन्मान राखून निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा आहे.’ असं ट्विट केलं आहे. दरम्यान, आजच्या या बैठकीत भोंग्याबाबत काय निर्णय होतो हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.