अलिबाग शहरालगत असलेल्या डंपिंग ग्राउंडवरील कचऱ्याला लागलेली आग तीन दिवसांपासून धुमसते आहे. त्यामुळे शहर आणि परिसरात धूर पसरला आहे. त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. यातून श्वसनाचे विकार जडण्याची भीती व्यक्त होत आहे. या घटनेची गंभीर दखल प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली असून अलिबाग नगर पालिकेला नोटीस बजावली आहे. अशाप्रकारे घनकचऱ्याची विल्हेवाट लावणे बंद करावे, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
अलिबाग नगरपालिका दरवर्षी कचरा व्यवस्थापनासाठी साडेसहा कोटी रुपयांचा खर्च करते. कचरा व्यवस्थापनासाठी येवढा निधी खर्च करूनही जर आग लावून कचऱ्याची विल्हेवाट लावली जात असेल, आणि जनतेचे आरोग्य धोक्यात येत आहे ही खेदजनक बाब आहे.
अलिबागकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार करीत अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक मदतीसाठी धावून आले. त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत आगीला आटोक्यात आणण्यासाठी लागणारी सुविधा उपलब्ध करून दिली. त्याचे काम युध्द पातळीवर सुरु करण्यात आले. आग विझविण्यासाठी लागणारे पाणी व अन्य साधन सामुग्री स्वखर्चाने उपलब्ध केली. त्यांच्याकडील दोन पोकलॅन एक जेसीबी तसेच पाण्याने भरलेले टँकर व अकरा कामगारांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु केले. प्रशांत नाईक मदतीसाठी धावून आल्याने नगरपरिषदेसह अलिबागकरांनी सुटकेचा श्वास घेतला.