रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात रस्त्यावरील मोठ्या भगदाडामुळे एका निष्पाप नागरिकाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अलिबाग–रोहा मार्गावरील वेलवली–खानाव पुलावरील मोठ्या भगदाडात पडून चांगू कमळू घरत यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून निकृष्ट दर्जाच्या कामामुळेच हा बळी गेल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खानाव गावालगत असलेल्या अलिबाग–रोहा मार्गावरील पुलाच्या मध्यभागी अनेक दिवसांपासून मोठे भगदाड पडले होते. या धोकादायक स्थितीबाबत वारंवार तक्रारी करूनही संबंधित यंत्रणांकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. अखेर याच भगदाडात पडून एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याने प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या घटनेनंतर तरुण सामाजिक कार्यकर्ते अॅड. राकेश पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांसह जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. संबंधित ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम करून नागरिकांच्या जीवाशी खेळ केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी संबंधित ठेकेदाराविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून त्याला काळ्या यादीत टाकण्याची मागणीही करण्यात आली आहे.
अलिबाग ते रोहा हा मार्ग रायगड जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचा संपर्क मार्ग मानला जातो. या रस्त्यावरून दररोज हजारो नागरिक आणि वाहने प्रवास करतात. अशा परिस्थितीत पुलाच्या मध्यभागी पडलेले मोठे भगदाड भविष्यात आणखी गंभीर दुर्घटनांना कारणीभूत ठरू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
तक्रारीनुसार, दोन वर्षांपूर्वी या पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने अल्पावधीतच पुलाची अवस्था खराब झाली. याशिवाय काम पूर्ण न करताच किंवा अपूर्ण काम पूर्ण झाल्याचे दाखवून शासकीय निधीची बिले काढण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या आरोपांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, या दुर्दैवी घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून पुलाची तातडीने दुरुस्ती करण्यासह संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. भविष्यात अशा निष्काळजीपणामुळे आणखी जीवितहानी होऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.