मुंबई, १ जून २०२३, प्रतिनिधी : बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट हिचे आजोबा आणि सोनी राजदान यांचे वडील नरेंद्र राजदान यांचे १ जून रोजी मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात निधन झाले. त्यांचे वय ९५ वर्षे होते.
अभिनेत्री आलियाचे नरेंद्र राजदान हे आजोबा प्रदीर्घ काळापासून आजारी होते त्यामुळे त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आपल्या आजोबांच्या जाण्याने आलीय खूप भावुक झाली आहे. आपल्या भावना व्यक्त करत तिने समाज माध्यमांवर एक भावनिक पोस्ट सामायिक केली आहे.
अभिनेत्री आलिया भट्टनं तिच्या इन्स्टाग्रामवर आजोबांचा एक जुना व्हिडिओ सामायिक केला आहे. या व्हिडिओमध्ये आलिया आणि रणबीर कपूर आजोबांबरोबर दिसत आहे. या व्हिडिओखाली आलियानं , ‘माझे आजोबा माझे हिरो…’ ‘९३व्या वर्षांपर्यंत गोल्फ खेळले, ९३ व्या वर्षापर्यंत काम केलं, माझ्यासाठी उत्तम ऑम्लेट बनवलं, छान गोष्टी सांगितल्या, नातीबरोबर खेळण्याचा आनंद घेतला… क्रिकेटवर, कुटुंबावर आणि स्केचिंगवर प्रेम केलं…शेवटच्या क्षणापर्यंत आयुष्याचा आनंद घेतला. माझं हृदय दु:खानं तसंच आनंदानंही भरलेलं आहे… कारण माझ्या आजोबांनी नेहमी आम्हाला आनंद दिला. मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते…’ अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.