हिंदी चित्रपट अभिनेता अक्षय कुमार याला त्याच्या कॅनेडियन नागरिकत्वावरून अनेकदा टीकेचा सामना करावा लागला. सोशल मीडियावर त्याला ‘कॅनडा कुमार’ म्हणून ट्रोल केलं गेलं. जवळपास तीन वर्षांपूर्वी अक्षयने सांगितलं होतं की, तो लवकरच भारतीय पासपोर्टसाठी अर्ज करणार आहे. यानंतर अनेकदा त्याला नागरिकत्वावरून प्रश्न विचारण्यात आला होता. अखेर स्वातंत्र्यदिनानिमित्त अक्षयने त्याच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.
Dil aur citizenship, dono Hindustani.
Happy Independence Day!
Jai Hind! 🇮🇳 pic.twitter.com/DLH0DtbGxk — Akshay Kumar (@akshaykumar) August 15, 2023
अथक प्रयत्नांनंतर अखेर त्याला भारताचं नागरिकत्व मिळालं आहे. सोशल मीडियावर त्याने याचा फोटो पोस्ट केला आहे. ‘हृदय आणि नागरिकत्व, दोन्ही हिंदुस्तानी’, स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. जय हिंद. असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. त्याने हा फोटो पोस्ट करताच त्यावर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ‘मनाने तू हिंदुस्तानी होताच, पण आज त्यावर शिक्कामोर्तब झालं,’ असं एकाने म्हटलं. तर ‘स्वातंत्र्यदिनानिमित्त चांगलं सरप्राइज दिलंस’, असं दुसऱ्या युझरने लिहिलं आहे.
याआधी जेव्हा अक्षयला त्याच्या नागरिकत्वावरून प्रश्न विचारण्यात आला होता, तेव्हा त्याने त्याचे मोकळेपणाने उत्तर दिले होते. “भारत माझ्यासाठी सर्वस्व आहे. मी जे काही कमावलं आणि मला जे काही मिळालं ते सर्व इथूनच मिळालं. मी नशीबवान आहे की मला त्याची परतफेड करायचीही संधी मिळाली. जेव्हा कोणतीच माहिती नसताना लोक तुमच्याविषयी बोलतात तेव्हा खूप वाईट वाटतं”, असं तो एका मुलाखतीत म्हणाला होता.
लोकसभा निवडणुकीपूर्वी एप्रिल २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुलाखतीनंतर अक्षय कुमारचं नागरिकत्व चर्चेचा विषय ठरला होता. तेव्हाही अक्षयने नागरिकत्वाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली होती. “माझ्याकडे कॅनडाचा पासपोर्ट असल्याने मी इतरांपेक्षा कमी भारतीय ठरत नाही. मी भारतीयच आहे. मी गेल्या नऊ वर्षांपासून इथे आहे. होय, मी २०१९ मध्ये म्हटलं होतं की मी भारतीय पासपोर्टसाठी अर्ज केला होता आणि नंतर कोरोना महामारी आली. त्यामुळे दोन-अडीच वर्षे सर्व गोष्टी बंद पडल्या”, असं तो म्हणाला होता.