जय महाराष्ट्र न्यूज, अकोला
अकोल्यात पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकाने अवैध हुक्का पार्लरवर धाड टाकून कारवाई केली. रात्रीच्या वेळी ही धडक कारवाई करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे, या कारवाईत अटक करण्यात आलेल्या 21 आरोपींमध्ये 10 शिक्षकांचा समावेश आहे.
अटक करण्यात आलेले सर्व शिक्षक हे पातुर तालुक्यातील विविध जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यरत आहेत. शिक्षकांना अटक झाल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
दरम्यान, उर्वरीत 11 आरोपी हे महाविद्यालयीन तरुण आहेत. या कारवाईत पोलिसांनी 1 लाख 10 हजारांचा मुद्देमालही जप्त केला. पहाटेपर्यंत ही कारवाई सुरु होती.