एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत संपकारी कर्मचाऱ्यांच्या विलिणीकरणावर भाष्य केले. एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण होईल हे कर्मचाऱ्यांनी डोक्यातून काढून टाकावे, असे मोठे विधान त्यांनी विधानसभेत केले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत भाष्य केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यासाठी आम्ही चर्चा केली असून सकारात्मक भूमिकासुद्धा घेतली. तसेच कर्मचाऱ्यांचे वेतनवाढीचा निर्णयही सरकारने घेतला आहे. मात्र तरिही कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. दरम्यान १० तारखेच्या आत एसटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात येईल असे, आश्वासनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.
कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाचा हट्ट केला तर ते कुठल्याही सरकारला शक्य होणार नाही. मात्र कर्मचाऱ्यांना चांगला पगार, योग्य सुविधा मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे अजित पवार म्हणाले. तसेच प्रत्येक आमदारान आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांची समजूत काढली पाहिजे, तर आता विद्यार्थ्यांच्या शाळासुद्धा सुरू झाल्या आहेत. मात्र एसटी बससेवा बंद असल्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत असल्याचेही ते म्हणाले.
एसटी कर्मचाऱ्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत आम्ही त्यांचे वेतनवाढ करण्याबाबत निर्णय घेतला. मात्र तरिही कर्मचारी विलिनीकरणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण होईल हे संपकारी कर्मचाऱ्यांनी डोक्यातून काढून टाका, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.