मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडानंतर आता अजित पवारांनी केलेली पक्षफुटी चर्चेत आहे. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्याचे पाहायला मिळाले. या दरम्यान आज अचानक अजित पवारांसह त्यांच्या गटाचे नेते हे शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्याने चर्चेला उधाण आलं आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या इतर आठ आमदारांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते. यानंतर पहिल्यांदाच शरद पवार यांना भेटण्यासाठी अजित पवार यांच्यासोबतच अदिती तटकरे, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ हे नेते यशवंतराव चव्हाण सेंटरवर पोहचले असल्याची माहिती मिळत आहे.
राष्ट्रवादीतील फुटीला १५ दिवसही उलटले नाही तोच महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा हालचालींना वेग आला आहे. अधिवेशनाच्या एक दिवस आधीच राष्ट्रवाचे सर्व मंत्री शरद पवार यांच्या भेटीला गेल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीत काय चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच शरद पवार यांचा आशीर्वाद अजित पवार आणि मंत्र्यांना मिळणार का? हा प्रश्न देखील विचारला जात आहे.
उद्यापासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. दोन्ही गटाकडे किती आमदार आहेत, हा आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. त्यामुळे कायदेशीर अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.