हिंडनबर्गच्या अहवालानुसार अदानी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जेपीसीपेक्षा सर्वोच्च न्ययालयाची समिती अधिक उपयुक्त असल्याची भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली. दरम्यान, अदानी प्रकरणावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी याप्रकरणी बोलणं टाळलं. अदानी प्रकरणावर शरद पवारांच्या भूमिकेशी सहमत असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.
अदानी प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले. तर, दुसरीकडे अदानी प्रकरणाची चौकशी जेपीसीमार्फत होण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. मात्र, जेपीसी चौकशी देखरेख ही सत्ताधारी पक्षांतर्गतच होईल आणि बहुमत हे सत्ताधारी पक्षाकडे आहे. त्यामुळे जेपीसीपेक्षा सर्वोच्च न्यायालयाची समिती अधिक उपयुक्त असल्याचे शरद पवार म्हणाले. अदानी प्रकरणात शरद पवारांच्या भूमिकेला अजित पवारांनी पाठिंबा दिला आहे. याप्रकरणी शरद पवारांची भूमिका तीच पक्षाची भूमिका असल्याचे वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे.
दरम्यान, अजित पवार आणि 7 आमदार नॉटरिचेबल झाल्याने राजकीय घडामोडींना वेग आला. मुख्यमंत्री शिंदे यांनी 40 आमदारंसोबत बंड केल्यासारखं अजित पवारही बंड पुकारतात का, या चर्चेला उधाण आलं होतं. याप्रकरणी शरद पवारांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार माध्यमांसमोर नाहीत म्हणजे ते नॉटरिचेबल नाही, असे शरद पवार म्हणाले. तर, आज पुण्यात अजित पवार माध्यमांसमोर आले.