राज्यात नाशिकहून निघालेल्या शेतकऱ्यांचा महामोर्च्याप्रकरणी राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर अमंलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने समिती गठन केली आहे. मात्र, या समितीत किसान सभेचे प्रमुख डॉ. अजित नवले यांना वगळण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांची भूमिका परखडपणे मांडणारे अजित नवले यांना वगळण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी होण्यासाठी संबंधित मंत्री, अधिकारी आणि शेतकरी प्रतिनिधी यांची समिती बनवण्याची मागणी किसान सभेच्या शिष्टमंडळाने केली होती. या समितीत जे.पी. गावित आणि डॉ. अजित नवले यांची नावे असावीत अशी अपेक्षा होती. मात्र, या समितीत डॉ. अजित नवले यांचे नाव वगळण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या महामोर्चाच्या समितीत डॉ. अजित नवले यांना न घेण्याचा आग्रह उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. शेतकऱ्यांचे प्रश्न यशस्वी होईपर्यंत डॉ. नवले मुद्दा लावून धरतात. त्यामुळे नवलेंना समतीत नको या चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे मी समितीत नसलो तरीही विनोद निकोले सरकारला पुरुन उतरील, शेतकऱ्यांच्या मागण्या धयास लावतील, असा इशारा नवले यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक पाऊल उचलणार असल्याचे आश्वासन दिले. त्यामुळे नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा महामोर्चा मागे घेत असल्याची घोषणा माजी आमदार जे.पी.गावित यांनी केली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेत कार्यवाहीला सुरूवात केली आहे. त्यामुळे शेतकरी महामोर्चा स्थगित करत असल्याची घोषणा जे.पी. गावित यांनी केली आहे. तसेच, सरकारकडून आमच्या मागण्या मान्य झाल्या असून त्याबाबत योग्य कार्यवाहीला सुरूवात झाल्यामुळे गावित यांनी सरकारचे आभार मानले आहेत.