Ahilyanagar Heatstroke: अहिल्यानगरमध्ये उकाड्याने घेतला पहिला बळी! शेतात काम करताना महिलेचा दुर्दैवी मृत्यू

अहिल्यानगरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी ठरला असून पारनेर तालुक्यातील महिला शेतकरी शेतात काम करताना मृत्युमुखी पडली

Ahilyanagar Heatstroke: अहिल्यानगरमध्ये उकाड्याने घेतला पहिला बळी! शेतात काम करताना महिलेचा दुर्दैवी मृत्यू

अहिल्यानगर: राज्यात वाढत्या तापमानाचा परिणाम आता जीवघेणा ठरू लागला असून, अहिल्यानगर जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पारनेर तालुक्यातील ढवळपुरी गावातील माळवाडी परिसरात राहणाऱ्या ४५ वर्षीय महिला शेतकरी हर्षदा चौधरी यांचा उष्णतेच्या तीव्रतेमुळे मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हर्षदा चौधरी या नेहमीप्रमाणे दुपारच्या सुमारास शेतात जनावरांसाठी चारा काढण्याचे काम करत होत्या. यावेळी उन्हाची तीव्रता अत्यंत जास्त होती. प्रखर उन्हामुळे त्यांना अचानक त्रास जाणवू लागला आणि त्या शेतातच बेशुद्ध पडल्या. ही बाब लक्षात येताच त्यांच्या पतीने तातडीने त्यांना ढवळपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

यानंतर पुढील वैद्यकीय तपासणीसाठी त्यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. शवविच्छेदनानंतर उष्माघातामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील हा यंदाच्या हंगामातील पहिला उष्माघाताचा मृत्यू ठरला आहे.

राज्यातील इतर भागांतही उष्णतेचा तडाखा वाढत चालला आहे. वर्धा जिल्ह्यात उष्माघातामुळे दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या घटना याआधी समोर आल्या आहेत. तसेच अकोला शहरात एका मालवाहू वाहनात आढळलेल्या अनोळखी व्यक्तीच्या मृत्यूमागेही उष्माघाताचे कारण असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग आणि प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुपारी १२ ते ४ या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच पुरेसे पाणी पिणे, हलके कपडे वापरणे आणि उन्हापासून संरक्षण करण्यासाठी छत्री किंवा टोपीचा वापर करणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.

तज्ज्ञांच्या मते, प्रखर उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होते आणि त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढतो. विशेषतः शेतकरी, बांधकाम कामगार आणि बाहेर काम करणाऱ्या व्यक्तींनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

अहिल्यानगरमधील या घटनेनंतर वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सावध राहणे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number