अहिल्यानगर शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. आनंदनगर परिसरात विजेच्या खांबामध्ये करंट उतरल्याने साडेतीन वर्षांच्या एका चिमुरडीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून महावितरणच्या निष्काळजीपणाविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रीती किरण गांगुर्डे (वय साडेतीन वर्षे) ही आपल्या घराजवळ इतर मुलांसोबत खेळत होती. त्याचवेळी खेळताना तिचा हात रस्त्यालगत उभ्या असलेल्या विजेच्या खांबाला लागला. पावसामुळे त्या खांबामध्ये करंट उतरला होता. खांबाला स्पर्श होताच तिला जोरदार विजेचा धक्का बसला आणि ती जागीच कोसळली.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. या घटनेने संपूर्ण आनंदनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून एका निष्पाप चिमुरडीचा अशा प्रकारे जीव गेल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, संबंधित विजेच्या खांबामध्ये करंट उतरत असल्याची समस्या नवीन नव्हती. गेल्या वर्षभरात याबाबत महावितरणकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वेळेत दुरुस्ती झाली असती तर हा निष्पाप जीव वाचला असता, अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली.
घटनेनंतर परिसरात मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले. त्यांनी महावितरणच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच मृत चिमुरडीच्या कुटुंबाला तातडीने १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणीही करण्यात आली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि संबंधित यंत्रणांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पाहणी करून घटनेचा पंचनामा करण्यात आला असून विजेच्या खांबामध्ये करंट कसा उतरला, याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच महावितरणकडूनही या घटनेबाबत अहवाल मागविण्यात आल्याची माहिती मिळत आहे