इर्शाळवाडी, १९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यात इर्शाळवाडी येथे महिन्याभरापूर्वी झालेल्या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली. या दुर्घटनेतून थोडक्यात वाचलेल्या १४४ जणांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. मुंबई – पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर तात्पुरत्या कंटेनर हाऊसमध्ये १४४ जणांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
कंटेनर हाऊस वस्तीत अंतर्गत रस्ते, पाण्याचे नळ, शौचालये, घरातील अंतर्गत सोयीसुविधा, रोजचे जेवण, नाश्ता, सीसीटीव्ही कॅमेरे, हायमास्ट दिवे, फिल्टर पाणी, अंगणवाडी, गुरांचा गोठा, शासकीय दवाखाना, पोलीस आणि खासगी पहारा, मोबाईल फोन, गॅस शेगडी, सिलेंडर, बिछाना या सर्व सोयीसुविधा देण्यात आल्या आहेत. दुर्घटनेत स्वकियांना गमावणाऱ्यांचे दुःख कमी झालेले नाही. पण सुरक्षित ठिकाणी स्थलांतर झाल्यामुळे इर्शाळवाडीतील जे नागरिक वाचले त्यांना दिलासा मिळाला आहे.
आजच्याच दिवशी एक महिन्यापूर्वी १९ जुलै रोजीच्या भयाण काळोख्या रात्री इर्शाळवाडी येथे दुर्घटना घडली होती. आज १९ ऑगस्ट रोजी या घटनेला एक महिना पूर्ण झाला आहे. सर्वांच्याच घरी आपल्या मृत कुटुंबियांच्या तसबिरी दिसत आहेत. आपले दहा सोबती गेल्याचे दुखः अंगणवाडीतील १६ चिमुकल्यांना आहे. त्यांच्या अंगणवाडी सेविकांना आहे. आज मुले खेळताना पाहून नातेवाईकांना आनंद होत असला तरी ज्यांची चिमुकली मुले मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली, त्यांच्या नशिबी मात्र या चिमुकल्यांचे खेळ पाहणे एवढेच हाती राहिले आहे. अशा अनेक आठवणींच्या गर्तेत आजच्या दिवशी इर्शाळवाडी दरडग्रस्तांनी अश्रूंना वाट मोकळी करुन दिली.