उत्तर प्रदेश राजकारणातील महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील गाझीपूरचे बहुजन समाज पक्षाचे खासदार अफजल अन्सारी यांचे लोकसभेचे सदस्यत्तव रद्द करण्यात आले आहे. अफझल अन्सारी यांना हत्येप्रकरणी गाझीपूरच्या न्यायालयाने त्यांना याप्रकरणी ४ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे अन्सारी यांना खासदारकी गमवावी लागली आहे.
तत्कालिन आमदार कृष्णानंद राय हे 29 नोव्हेंबर 2005 रोजी क्रिकेट सामन्याचं उद्घाटन करुन परतत असताना अफझलचा भाऊ मुख्तार अन्सारी टोळीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोळीबारात आमदार कृष्णानंद राय यांच्यासह सात जणांची हत्या केली. या प्रकरणात मुन्ना बजरंगी या गुन्हेगाराचे नाव समोर आले होते. परंतु, काही वर्षांपूर्वी मुन्ना बजरंगीची तुरुंगात हत्या झाली होती. या हत्येप्रकरणी अफजल अन्सारी आणि मुख्तार अन्सारी यांना आरोपी ठरवण्यात आले होते.
या हत्येप्रकरणी 22 नोव्हेंबर 2007 रोजी खासदार अफजल अन्सारी आणि मुख्तार अन्सारी यांच्यावर गँगस्टर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणाच्या लागलेल्या निकालात गाजीपूर एमपी-एमएलए न्यायालयाने बसपा खासदार अफजाल अन्सारी यांना दोषी ठरवलं असून 4 वर्षांची शिक्षा आणि 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. परिणामी अफझल अन्सारी यांना खासदारकी गमवावी लागली आहे.