महाराष्ट्राचे माजी गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे हिंदू देवीदेवतांबाबत नेहमीच वादग्रस्त करत असतात. गेल्या वर्षी आव्हाड यांच्यावर हर हर महादेव या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी एका प्रेक्षकाला मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांना अटक झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी हिंदू सणांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. काल मुंबईत राष्ट्रवादीकडून विभागीय कार्यकर्ता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाषणावेळी त्यांनी वादग्रस्त विधान केले. त्यावर आव्हाडांचं रामनवमी, हनुमान जयंतीबद्दलचं वक्तव्य आक्षेपार्ह असल्याचे फडणीस म्हणाले.
यावर देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत भूमिका मांडली. “दंगली घडू नये म्हणून मी बोलतोय. सध्याच्या परिस्थितीवर बोलणं कुठे चुकलं? मला कुणाकडूनही हिंदू असण्याच्या प्रमाणपत्राची गरज नाही. माझ्या वक्तव्यातून कुणालाही बदनाम करण्याचा प्रयत्न नाही. दोन्ही गट बाजूला निघून जायचे. हे मी सगळं अनुभवलं आहे. त्यामुळे हे काय घडतंय हे माझ्यापेक्षा जास्त कुणाला कळूच शकत नाही. बोललं नाही तर महाराष्ट्राला कळणार नाही”, असं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी दिलं.
“मी कट्टर हिंदू आहे. मी वसुधैव कुटुंबकम मानणारा हिंदू आहे. राम आपल्या वडिलांचं ऐकणारा होता. आईचं ऐकणारा राम होता. भावाला सन्मानित करणारा राम होता. तो राम आम्हाला माहीत आहे. समाजात एकता, समता, बंधुत्व मानणारा राम आहे. समाजात एकता ठेवणे शिका. समाजात द्वेष पसरवल्याने देशाचे नुकसान होते”, असं आव्हाड म्हणाले.
“मला कोणत्याही हिंदूचे प्रमाणपत्र नको. ज्या आईवडिलांनी मला जन्म दिला त्यांनी मला प्रमाणपत्र दिले आहे. गेल्या वर्षीचा रामजन्मोत्सव बघा. त्यापूर्वीचा रामजन्मोत्सव बघा. असा माहौल नव्हता. पुढं काही होणार असेल तर समाजाला अलर्ट करणे ही माझी जबाबदारी आहे. गेल्यावर्षी रमजानमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. समाजात माहौल खराब होत असेल तर बोलावं लागेल की माहौल डिसटर्ब होतो. देशात काय काय होतो ते बघा. त्यानंतर अंदाज लावा काय काय होणार आहे”, असंही जितेंद्र आव्हाड यांनी सुनावले.