नागपूर : भारतात सध्या युवा एकाच मागणीसाठी एकवटले आहेत. ते म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी. देशात नीट पेपरफुटी प्रकरण समोर आल्यानंतर कॉक्रोज जनता पार्टीने (CJP) मंत्री प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. दरम्यान, CJP चे संस्थापक अभिजीत दीपके परदेशातून भारतात आल्यापासून विविध शहरांमध्ये आंदोलन करत आहेत. सोमवारी, जयपूर येथे झालेल्या आंदोलनात दीपके यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर आज, मंगळवारी CJP चे नागपूर येथे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. दरम्यान, आंदोलनापूर्णी दीपके यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे.
CJP नं 6 तारखेला दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन केले. त्यावेळी सरकारला अल्टिमेटम देण्यात आले. आज नागपुरात आंदोलन आहे. तर येत्या 20 जूनला दिल्लीत मोठ आंदोलन होणार आहे. तसेच राजीनामा घेतल्याशिवाय परतणार नाही, असा पवित्रा दीपके यांनी मांडला. पुढे दीपके म्हणाले की, कोणी तरी जबाबदारी घ्यायला हवी. मात्र कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही. मोदींना विनंती आहे की, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा. मोदीजी यांना पंतप्रधानपदी 4 हजार दिवस झाले. या काळात कोणतीही चार परीक्षा दाखवा जी लिंक झाली नाही. टेलिग्राममुळे काय फरक पडणार. पाच विद्यार्थी आत्महत्या करतात आणि अधिकाऱ्याची फक्त बदली करतात. इतकीच किंमत विद्यार्थ्याची आहे का ?, माझ्यावर काल झालेला हल्ला हा बेरोजगारीमुळे झाला. हल्ला करणाऱ्या जवळ चांगली नौकरी असती तर तो हल्ला झाला नसता. आजवर आलेल्या सर्व पक्षांनी तेच केलं. मात्र आज सत्तेत जे असतील त्यांनाच प्रश्न विचारणार आहे. ज्यांनी माझ्यावर हल्ला केला त्या व्यक्तीचे संघाच्या गणवेशात माझ्याकडे फोटो आहेत. मला राजीनामा घेण्यासाठी राजकीय पक्ष बनवावं लागेल तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे. उद्या कोणाच्या घरात पाणी-वीज नाही आली तर राजकीय पक्ष उघडणार का ?, आपल्या देशात हिंदू-मुस्लिम मुद्यावर राजकारण होत आहे. यातून युवकांना काय मिळतं, काहीच नाही. आमच्यासाठी शांततापूर्ण ही आंदोलनं असणार आहेत. आम्हाला बांगलादेश, नेपाळला पाहण्याची गरज नाही.
पुढे दीपके यांनी नमूद केले की, महात्मा गांधी यांनी देशात बदल आणला. भारत आंदोलनापासून स्वतंत्र झाला. त्यामुळे लोकशाहीसाठी आंदोलन महत्वाचं आहे. माझ्या कुटुंबाप्रती असणाऱ्या जबाबदारीपेक्षा माझी देशाप्रती मोठी जबाबदारी आहे. मी पाच-सहा राज्यात गेलो. कुठेच स्वच्छता नाही. ज्यांना देशातील युवकांची चिंता आहे. त्यांनी आंदोलनात येऊन सहकार्य करावे. जे माझे मित्र ते मला सहकार्य करतात.