‘नियम पाळा, नाहीतर कारवाईला सामोरे जा’ अशा कडक भूमिकेसह तुकाराम मुंढे यांनी मुंबईतील सहा हॉटेल्सना ‘मुंढे स्टाईल’ कारवाईचा दणका दिला. मुंबईतील 6 बड्या रेस्टॉरंटनंतर आणखी एका ठिकाणी दोन नामांकित रेस्टॉरंटवर अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीएकडून मोठी कारवाई केली आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रसिद्ध ‘यल्ला यल्ला’ आणि ‘आईच्या गावात’ या दोन रेस्टॉरंटवर एफडीएची धडक कारवाई झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एफडीएकच्या तपासणीत किचेनमध्ये रासायनिक रंगांचा बेसुमार वापर, बुरशी आलेले अन्नपदार्थ आणि ग्राहकांची उघड फसवणूक होत असल्याचे समोर आल्याने दोन्ही हॉटेल्सचे परवाने पुढील आदेशापर्यंत तातडीने निलंबित करण्यात आले आहेत. विद्या नगर येथील ‘यल्ला यल्ला रेस्टॉरंट’च्या किचेनमध्ये बटर चिकन, कबाब आणि चिकन लॉलिपॉपच्या ग्रेव्हीत मोठ्या प्रमाणावर हानिकारक ‘सिंथेटिक फूड कलर’ वापरला जात असल्याचे आढळले. पथकाने जागेवरच 20 ते 25 रासायनिक रंगांचे डबे जप्त करून नष्ट केले.
दुसरीकडे, ईतखेडा-कांचनवाडी येथील प्रसिद्ध ‘आईच्या गावात’ रेस्टॉरंटमध्ये मेनुकार्डवर बटर नान लिहून प्रत्यक्षात स्वस्त दर्जाचे ‘वेजिटेबल फॅट स्प्रेड’ वापरून ग्राहकांची आर्थिक फसवणूक केली जात होती. तसेच रस काढण्यासाठी चक्क बुरशी लागलेले आंबे आणि सडलेल्या पालेभाज्या साठवून ठेवलेल्या आढळल्या. अन्न सुरक्षा व मानके अधिनियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एफडीएचे अधिकारी व. ता. रोडे, कि. ल. झाडे आणि सहाय्यक आयुक्त द. वि. पाटील यांच्या पथकाने ही कडक कारवाई केली आहे.
नुकतीच तुकाराम मुंढे यांनी सोमवारी मुंबईतील तब्बल 6 बड्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बेकऱ्यांचे परवाने रद्द केल्याची माहिती समोर आली होती. तुकाराम मुंढे यांनी सांताक्रूझ, अंधेरी, वांद्रे, बोरीवली, भांडुप आणि नरिमन पॉइंट येथील बड्या समूहाच्या रेस्टॉरंटलाही सोडले नाही. यानंतर आता छत्रपती संभाजीनगर येथे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या “सेफ फूड, सेफ महाराष्ट्र” मोहिमेअंतर्गत एक मोठी कारवाई करण्यात आली आहे.