टेलिव्हिजनची ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंतला अटक करण्यात आली आहे. अंबोली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. एका मॉडेलचा फोटो व्हायरल केल्याच्या आरोपाखाली राखीला अटक झाली आहे. थोड्याच वेळात तिला अंधेरी कोर्टात हजर केलं जाणार आहे. अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्राने ट्विट करत याविषयीची माहिती दिली. या ट्विटमध्ये शर्लिनने एफआयआरविषयीही माहिती दिली आहे. शर्लिनच्या तक्रारीनंतरच अंबोली पोलिसांनी राखीला अटक केली आहे. अंबोली पोलिसांनी एफआयआर ८८३/२०२२ संबंधी राखी सावंतला अटक केली आहे. काल राखी सावंतचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला, असं ट्विट शर्लिनने केलं आहे.
BREAKING NEWS!!! AMBOLI POLICE HAS ARRESTED RAKHI SAWANT IN RESPECT WITH FIR 883/2022 YESTERDAY, RAKHI SAWANT’S ABA 1870/2022 WAS REJECTED BY MUMBAI SESSIONS COURT — Sherlyn Chopra (शर्लिन चोपड़ा)🇮🇳 (@SherlynChopra) January 19, 2023
राखी सावंत आज दुपारी तिचा पती आदिल खान दुरानी याच्यासमवेत भागीदारीमध्ये सुरू केलेल्या डान्स अकॅडेमीचं उद्घाटनही करणार होती. दुपारी ३ च्या सुमारास हे उद्घाटन केलं जाणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, आता राखी सावंतच्या अटकेमुळे हे उद्घाटन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राखीविरोधात शरलीन चोप्रानंच तक्रार दाखल केल्याचं सांगितलं जात आहे. शरलीन चोप्राचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ राखीनं पत्रकार परिषदेत दाखवला होता आणि त्यावरून आक्षेपार्ह भाषेत विधानही केलं होतं म्हणून राखीविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे.
शर्लिन चोप्रा ही अभिनेत्री आणि मॉडेल आहे. २०१२ मध्ये तिने ‘प्लेबॉय’ मासिकासाठी न्यूड फोटोशूट केलं होतं. त्याच्या दोन वर्षांनंतर तिचे फोटो समोर आले होते. एमटीव्ही स्पिल्ट्सविलाच्या सहाव्या सिझनचं तिने सूत्रसंचालन केलं. तिने बिग बॉसमध्येही भाग घेतला होता.