वन्यजीव संरक्षण कायद्याचा भंग? छाया कदम यांच्या विरोधात तक्रार दाखल

छाया कदम यांनी वन्य प्राण्यांचे मांस खाल्ल्याची कबुली दिल्याने वाद निर्माण; तिन्ही संस्थांनी कायदेशीर तक्रार दाखल केली.

वन्यजीव संरक्षण कायद्याचा भंग? छाया कदम यांच्या  विरोधात तक्रार दाखल

मुंबई: अभिनेत्री छाया कदम या सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. त्यांच्यावर वन्य प्राण्यांचे मांस खाल्ल्याचा आरोप करण्यात आला असून, प्राणी हक्कांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी त्यांच्या विरोधात राज्य वन विभागाकडे कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. प्लांट अँड अॅनिमल्स वेल्फेअर सोसायटी (PAWS-मुंबई), OIPA आणि अम्मा केअर फाउंडेशन (ACF) या तीन संस्थांनी संयुक्तरीत्या ही तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणाची सुरुवात छाया कदम यांनी एका सोशल मीडिया मुलाखतीत दिलेल्या विधानामुळे झाली. त्यांनी या मुलाखतीत उघडपणे सांगितले की, त्यांनी उंदीर हरण, डुक्कर, ससे, रानडुक्कर आणि मॉनिटर लिझर्ड यांसारख्या विविध वन्य प्राण्यांचे मांस खाल्ले आहे. या प्रजाती वन्यजीव संरक्षण अधिनियम, 1972 अंतर्गत संरक्षित असून, त्यांचे शिकार करणे, पकडणे किंवा त्यांचे मांस खाणे हे कायद्याने गुन्हा आहे.

कार्यकर्ते सुनीश एस. कुंजू यांनी सांगितले की, आम्ही तक्रारीसह त्या मुलाखतीची YouTube लिंक देखील सादर केली आहे, ज्यामध्ये छाया कदम स्वतः हे विधान करताना स्पष्टपणे दिसतात. हे वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972  तसेच जैविक विविधता कायदा, 2002 अंतर्गत गंभीर स्वरूपाचा गुन्हा मानला जातो.

हेही वाचा:मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; जलसाठा केवळ 23 टक्क्यांवर

या प्रकरणामुळे छाया कदम यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. सोशल मीडियावर अनेक पर्यावरणप्रेमी आणि प्राणी हक्क कार्यकर्ते संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. काहीजणांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे, तर काहीजणांनी हा प्रकार अज्ञानातून घडला असावा असेही म्हटले आहे.

या प्रकरणात वन विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली असून, अभिनेत्रीने नक्की कधी आणि कुठे हे मांस खाल्ले याचा तपास लावण्यात येणार आहे. जर हे विधान सत्य आणि पुराव्यानिशी सिद्ध झाले, तर छाया कदम यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार, संरक्षित प्राण्यांचा शिकार किंवा त्यांचे मांस खाणे यासाठी दोषींना सात वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे. त्यामुळे हे प्रकरण केवळ चर्चेपुरते मर्यादित न राहता कायदेशीर वळण घेण्याची शक्यता आहे.

प्रसिद्ध कलाकार असलेल्या छाया कदम यांनी याआधी सैराट, लाल सिंग चड्ढा, गंगूबाई काठियावाडी अशा अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. अशा कलाकाराकडून असे विधान होणे, हे समाजातील जनतेसाठी चुकीचा संदेश देणारे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

सध्या तरी छाया कदम यांच्याकडून या तक्रारीवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र या वादामुळे त्यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे आणि कायदेशीर प्रक्रियेच्या पुढील टप्प्यांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number