जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
पुनर्विकास करायच्या नावाखाली रविंद्र नाट्य मंदिरासारखी बालगंधर्वची विल्हेवाट लावायची आहे का? असा सवाल ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी केलाय. पुण्यातील सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराची वास्तू लवकरच जमीनदोस्त होणार आहे. ही वास्तू पाडून त्यावर बहुमजली थिएटर उभारण्यात येणार आहे. त्यात विविध आकारांच्या सुसज्ज थिएटर्ससह मुबलक पार्किंग आणि जागतिक पातळीवरील मनोरंजनाच्या सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.
पुणे महापालिकेचे पुढील आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सादर केले, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुणे शहरातील नाट्यगृहासाठी या अंदाजपत्रकात भरीव तरतूद करण्यात आली आहे. मात्र, या सगळ्यात महत्वाची योजना म्हणजे बालगंधर्व रंगमंदिराचा पुर्नविकास.
पुण्यातील सांस्कृतिक पंढरी, कलाकारांचे माहेरघर अशा विविध बिरुध्दांनी ओळखल्या जाणाऱ्या बालगंधर्व रंगमंदिराचा पुर्नविकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी या अंदाजपत्रकात तब्बल 10 कोटींची तरतूद करण्यात आलीय.