जमिनीच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने वकील सतीश उके यांना गुरुवारी ताब्यात घेतले असून आज ईडीचे पथक सतीश उके आणि त्यांचा भाऊ प्रदीप उके यांना घेऊन मुंबईत आले आहे. दरम्यान, उके यांच्यावर झालेल्या कारवाईवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, सतीश उके यांच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले असून, नागपूर पोलिसांनी ईडीकडे गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीकडून उकेंवर कारवाई करण्यात आली.
फडणवीस म्हणाले, ‘उकेंविरुद्ध २००५पासून अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच न्यायाधीशांची खोटी तक्रार केल्याबद्दल न्यायालयाचा अवमान झाल्याप्रकरणी त्यांना शिक्षा देण्यात आली आहे. त्यामुळे मला असे वाटते, कायदेशीर आहे ते कायद्याने होईल आणि ईडी तेच करेल’, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नागरपूरच्या ईडी कार्यालयात वकील सतीश उके आणि त्याचे मोठे भाऊ प्रदीप उके यांची पाच तास चौकशी झाल्यानंतर ईडीचे पथक त्यांना घेऊन मुंबईत आले आहे. त्यामुळे त्यांची पुढील चौकशी मुंबईच्या ईडी कार्यालयात होणार आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून ईडीची कारवाई होत असल्याचा आरोप वकील सतीश उके यांच्या कुटुंबियांनी केला आहे. सतीश उके यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. फडणवीसांनी २०१४मधील विधानसभा निवडणुकीवेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी खटल्यांची माहिती लपवल्याचा आरोप सतीश उके यांनी केला होता. याविरोधात सतीश उके यांनी याचिका दाखल केली होती.