पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पुण्यातील धनकवडीत आईवरून शिवी दिल्याच्या रागातून एका तरुणाची निर्घृण हत्या केली गेली आहे. पुण्यातील धनकवडी शंकर महाराज उड्डाण पुलाखाली ही घटना घडली असून आरोपीविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सहकारनगर पोलिसांनी काही तासांतच आरोपी किरण उर्फ बिट्या रवी वाघमारे (वय 24, रा. शंकर वसाहत, संभाजीनगर) याला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शंकर महाराज उड्डाण पुलाखाली आरोपी किरण आणि त्याचा मित्र हे दोघे दारू पिण्यासाठी बसले होते. त्यावेळेस दारू पित असताना दोघांमध्ये दारूच्या नशेत किरकोळ वाद झाला. त्यांच्यातील सुरु असलेल्या बाचाबाचीत एकाने थेट आईवरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आपल्या आईवरून दिलेल्या या शिवीचा समोरच्याला प्रचंड राग आला. याच रागाच्या भरात आरोपीने फरशीचा दगड डोक्यात घालून तरुणाची हत्या केली.
हा वार इतका भीषण होता की, तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्या जागेवरच मृत्यू झाला. घटनास्थळी नागरिकांची वर्दळ वाढल्याने नागरिकांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून तत्काळ पोलिसांना खबर केली आणि घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी आपले सूत्र अशा प्रकारे फिरवले की काही तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या.
आरोपी किरण वाघमारे याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्यावर खुनाच्या (IPC/BNS अंतर्गत) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास सहकारनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष जाधव करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.