ठाणे : सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असतानाच एक सुखद धक्का देणारी घटना ठाणे रेल्वे स्थानकावर घडली आहे. टिटवाळ्याहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या एका स्लो लोकल ट्रेनमध्ये आज, शनिवारी संध्याकाळी एक गर्भवती महिलेची प्रसूती झाली असून तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. या महिलेला धावत्या लोकलमध्येच प्रसूती कळा येऊ लागल्यानंतर रेल्वे पोलीस, महिला प्रवासी यांच्या तत्परतेमुळे लोकलच्या डब्यात तिची प्रसूती करण्यात आली असून माता आणि नवजात बाळ दोन्ही सुखरूप असल्याचे समजते. सध्या त्या दोघींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शीतल बबलू कांबळे असं प्रसूती झालेल्या महिला प्रवाशाचं नाव आहे. त्या टिटवाळा इथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडं (CSMT) जाणाऱ्या स्लो लोकल ट्रेननं प्रवास करत होत्या. आज, सायंकाळी 5.34 वाजण्याच्या सुमारास लोकल ट्रेन ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान पोहचत असतानाच शीतल यांना तीव्र प्रसूती कळा येऊ लागल्या. डब्यातील इतर महिला प्रवाशांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीनं एकमेकांना मदतीचा हात दिला. गाडी ठाणे स्थानकात थांबताच रेल्वे पोलिसांनी तातडीनं धाव घेतली. रेल्वे पोलीस आणि प्रवाशांच्या तत्परतेमुळं लोकलच्या डब्यातच शीतल यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. नंतर त्वरीत रेल्वे पोलिसांनी आई आणि नवजात मुलीला पुढील उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले.