मुंबई, २४ जून २०२३, प्रतिनिधी : बॉलीवूड अभिनेता सोनू सूद हा त्याच्या अभिनयासह त्याच्या समाजकार्यासाठीही ओळखला जातो. गेल्या काही वर्षांत त्याने बरेच उल्लेखनीय काम केले आहे. इतकेच काय तर सोनू सूदने महामारीच्या काळात लोकांसाठी मसिहा म्हणून भरपूर काम केले. त्यामुळे तो नेहमीच चर्चेत असतो.
सूद चॅरिटी फाऊंडेशनचा संस्थापक म्हणून सोनू सूदने कायम समाजासाठी बरीच कामे केली आहेत. त्याने शिक्षण, आरोग्यसेवा, कौशल्य विकास आणि आपत्ती निवारण या सगळ्यांवर लक्ष केंद्रित करून सूद चॅरिटी फाऊंडेशनच्या माध्यमातून लोकांची मदत केली. दरम्यान आता पुन्हा एकदा त्याने एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. सूद चॅरिटी फाऊंडेशनने डिव्हाईन इंडिया युथ असोसिएशन आणि सरत चंद्र अकादमी यांच्या सहकार्याने 2023-24 या वर्षासाठी ‘संभवम’ हा नवा उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे.
या उपक्रमाद्वारे नागरी सेवा परीक्षेची तयारी करू इच्छिणाऱ्या आर्थिकदृष्ट्या वंचित असणाऱ्या सगळ्या तरुणाईला विनामूल्य ऑनलाइन आय ए एस कोचिंग मार्गदर्शन मिळणार आहे.सोनूच्या या अनोख्या उपक्रमाने अनेक तरुण IAS अधिकारी घडणार आहेत.